मटणाच्या वाटणीवरून वाद; डोक्यात मारला गावठी कट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:47 AM2019-03-23T00:47:29+5:302019-03-23T00:48:51+5:30

धुलीवंदनानिमित्त मटणाची पार्टी करण्यासाठी मित्रांनी बोकड आणले. परंतु, एका त्रयस्थ मद्यपीने दमदाटी करून मटणात वाटा मागितला.

Dispute Resolution; Screamed | मटणाच्या वाटणीवरून वाद; डोक्यात मारला गावठी कट्टा

मटणाच्या वाटणीवरून वाद; डोक्यात मारला गावठी कट्टा

Next

कडा : धुलीवंदनानिमित्त मटणाची पार्टी करण्यासाठी मित्रांनी बोकड आणले. परंतु, एका त्रयस्थ मद्यपीने दमदाटी करून मटणात वाटा मागितला. मटन दिल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याने चिडलेल्या मद्यपीने गावठी कट्टा काढत एकाच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी सकाळी आष्टी तालुक्यातील हातवण येथे घडली.
गुरुवारी धुलीवंदन असल्याने हातवण येथील महेंद्र शंकर कोरडे आणि त्यांचे मित्र दस्तगीर चाँद सय्यद, गोरख निवृत्ती काळोखे आणि इतर मित्रांनी मटणासाठी बोकड आणले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास दस्तगीर यांच्या घराशेजारी या मित्रांनी ते बोकड कापले. त्यानंतर मटणाचे हिस्से करत असताना तिथे जनार्दन बेरड (रा. तरडगव्हाण, जि. अहमदनगर) हा मद्यपी मटण घेण्यासाठी आला. सध्या मटण वाटपाची यादी तयार झाली असून उरले तर तुला देऊ, असे सांगताच जनार्दनने आरडाओरडा करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे कोरडे आणि त्यांच्या मित्रांनी जनार्दनला एक किलो मटन दिले आणि बदल्यात साडेचारशे रुपये मागितले. याचा राग आल्याने जनार्दनने स्वत:जवळील गावठी कट्टा काढला आणि कोरडे यांच्या डोक्यात मारला. यावेळी त्या कट्ट््यातून एक काडतूस देखील खाली पडली. कट्टा जोरात लागल्याने कोरडे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यानंतर कोरडे यांच्या मित्रांनी मध्यस्थी करत जनार्दनला रोखले आणि मारहाण करत पिटाळून लावले. याप्रकरणी कोरडे यांच्या फिर्यादीवरून जनार्दनवर अंभोरा पोलिसात शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Dispute Resolution; Screamed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.