अपात्रतेची सुनावणी की भाजपचा विरोध; मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची तयारी का थांबली?
By शिरीष शिंदे | Published: September 25, 2023 06:49 PM2023-09-25T18:49:08+5:302023-09-25T18:50:43+5:30
सूचना नसल्याने जिल्हा प्रशासनाकडून नाही कोणतेच नियोजन
बीड : ‘शासन आपल्या दारी’ या शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार परळी येथे येणार असल्याची चर्चा २७ ऑगस्टपासून वेळोवेळी केली जात होती; परंतु शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी, स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध व कार्यक्रमासाठी २ कोटी २१ लाख रुपये खर्च होणार असल्याच्या टीकांमुळे हा कार्यक्रम घेण्यासंदर्भाने कोणत्याही सूचना प्राप्त नसल्याने प्रशासकीय स्तरावरून तयारी थांबली आहे.
सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत, कागदपत्रे वेळेवर मिळत नाहीत अशी ओरड होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी; तसेच इतर सुविधा देण्यासाठी राज्यात विविध जिल्ह्यांत ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार अहमदनगर, कोल्हापूर, जेजुरी, परभणीसह इतर ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. दरम्यान, राष्ट्रवादीतून बाहेर पडून अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांच्या बालेकिल्ल्यात परळीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्याचे ठरले. त्यानुसार जिल्हा प्रशासन कामाला लागले. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी विविध कार्यालयीन प्रमुखांच्या वेळोवेळी बैठका घेत प्रमाणपत्र व शासकीय योजनांच्या प्रदर्शनाची तयारी केली होती. २४ सप्टेंबर रोजी कार्यक्रम होणार असल्याने यासाठी २ कोटी २१ लाख रुपये ९० हजार रुपये खर्च होणार असल्याचे समोर आले. त्यामुळे विरोधकांनी सडकून टीकाही केली.
असे होते नियोजन
परळी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी २ कोटी २१ लाख ९० हजार ८५० रुपयांची निविदा मागविण्यात आली. मुख्य मंडपासाठी ८१ लाख ९४ हजार तर साइड मंडपासाठी ६० लाख १४ हजार रुपयांचा उल्लेख त्या निविदेत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला होता. मोजक्या शब्दांत सोशल मीडियावर एक्सद्वारे (ट्विटर) सरकारवर टीकाही केली होती. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.
राजकीय वातावरणही अस्थिर
सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या विरोधात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत. आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणीमुळे राजकीय वातावरण अस्थिर आहे. यासह इतर कारणांमुळे ‘शासन आपल्या दारी’ येण्याची तयारी सध्या तरी थांबली आहे.
भाजप नेत्यांचा विरोध
परळी येथे होणाऱ्या कार्यक्रमास जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी विरोध केला आहे. या कार्यक्रमास येऊ नये, असा निरोप उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आला होता. तेव्हापासूनच हा कार्यक्रम घेतला जाईल की नाही यावर शंका घेतली जात होती.