नेटवर्कअभावी सेवा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:42 AM2021-04-30T04:42:43+5:302021-04-30T04:42:43+5:30
बीड : काही दिवसांपासून बीड शहरात दूरसंचारची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. ...
बीड : काही दिवसांपासून बीड शहरात दूरसंचारची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते. तर दुसरीकडे बीटीएस टॉवरची क्षमता कमी पडू लागल्याने ग्राहकांना फोन संपर्क करताना तांत्रिक अडथळे येत आहेत.
वीजपुरवठा सुरळीत करा
बीड : कोरोनामुळे शेतकरी, शेतमजुरांचे नुकसान झालेले आहे. मागील काही दिवसांपासून वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकऱ्यांना उन्हाळी पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. यामुळे पिके वाळू लागली आहेत. सुरळीत वीजपुरवठ्याची मागणी नाथापूर, पिंपळनेर, नेकनूर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
रस्ता दुरूस्त करावा
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली असून सहा महिन्यांपासून ही परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
केज : तालुक्यात बहुतांश गावांमध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने स्वच्छतेचा मोठा अभाव निर्माण झाला आहे. परिणामी, विविध आजार डोके वर काढत आहेत. अनेक गावांमध्ये नाल्या तुंबल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
श्वानांचा वावर वाढला
बीड : शहर व परिसरात अनेक प्रभागांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या श्वानांच्या वाढत्या संख्येचा मोठा त्रास शहरवासीयांना होत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
‘जैविक’चा धोका
माजलगाव : बहुतांश खासगी रुग्णालये मुख्य रस्त्यावर जैविक कचरा रस्त्यावर टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.