बीडमध्ये रस्ते बनले वाहनतळ; विस्कळीत वाहतुकीने अपघातास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 11:26 PM2018-01-24T23:26:09+5:302018-01-25T11:59:41+5:30

मागील काही दिवसांपासून शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांसह पादचा-यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हातगाड्यांसह धनदांगड्यांनी रस्त्यावर केलेली अतिक्रमणे, बंद सिग्नल व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्था बिघडली आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही नगर पालिका व वाहतूक शाखा पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Disrupted traffic in Beed | बीडमध्ये रस्ते बनले वाहनतळ; विस्कळीत वाहतुकीने अपघातास निमंत्रण

बीडमध्ये रस्ते बनले वाहनतळ; विस्कळीत वाहतुकीने अपघातास निमंत्रण

googlenewsNext
ठळक मुद्देअतिक्रमण, बंद सिग्नल व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे समस्या

बीड : बीड शहरातून सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यातच मागील काही दिवसांपासून बायपास रस्ता सुरू झाल्याने काही मोठी वाहने शहराबाहेरून धावतात. तरीही एमआयडीसी, मोंढा व इतर कामांसाठी शहरात येणा-या मोठ्या वाहनांची संख्या भरपूर आहे. जालना रोडवर साठे चौक परिसरात गेवराईकडे जाणारी वाहने मुख्य रास्त्यावर रिक्षा, जीप उभा करून प्रवाशांची अवैध वाहतूक करतात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक केली जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी वाहतूक शाखेचे दोन पोलीस कर्मचारी नियमीत कर्तव्यावर असतात. असे असतानाही पोलिसांच्या नाकावर टिच्चून खाजगी वाहनधारक अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे दिसून येते.

साठे चौकासह छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोड, नगर नाका, जिल्हा रूग्णालय परिसर, तेलगाव नाका, बार्शी नाका, भाजी मंडई आदी भागातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. याठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त असतानाही सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे दिसते.

रस्ते बनले वाहनतळ
बीड शहरात वाहन पार्किंग करण्यासाठी हक्काची ठिकाणे नाहीत. त्यामुळे नागरिक सर्रास आणि बिनधास्तपणे रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे मोठे रस्तेही अरूंद बनले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, बसस्थानक परिसर, नगर पालिका, पोस्ट आॅफिस, पांगरी रोड या भागात वाहने रस्त्यावरच उभी असतात. या गर्दीतून मार्ग काढताना मोठ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनांवर कारवाई करून त्यांना हक्काची पार्किंग उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

पालिकेकडे पाठपुरावा; पण सहकार्य नाही
शहरातील अतिक्रमणे, सिग्नल, पार्किंग आदींच्या प्रश्नांवर पोलिसांनी वारंवार बीड नगर पालिकेला कळविले आहे.परंतु त्यांच्याकडून अद्याप याची दखल घेतली गेली नाही. पोलिसह केवळ स्मरणपत्रे देऊन आपली जबाबदारी झटकत आहेत. याचा कायमस्वरूपी पाठपुरावा होत नसल्याने पालिकाही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसते.

पोलीस सुस्त अन नागरिकही जबाबदारीबाबत अनभिज्ञ
चौकाचौकात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नियूक्त असतात. परंतु त्यांच्याकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपेक्षेप्रमाणे प्रयत्न केले जात नाहीत. त्यातच नागरिकांनाही आपल्या जबाबदारीचे भान राहिलेले नसते. सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघण त्यांच्याकडून केले जात आहे. पोलिसांएवढेच याला वाहनधारकही जबाबदार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

सीओंचा भ्रमणध्वनी बंद
याबाबत नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांना भ्रमणध्वणीवरून वारंवार संपर्क केला. परंतु तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही. पालिकेतील विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ते महत्वाच्या मिटींगसाठी बाहेर असल्याचे सांगण्यात आले.

वाहतूक कोंडी बनली डोकेदुखी
शहरातील प्रत्येक रस्त्यावर सध्या वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या कोंडीतून मार्ग काढताना सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये वृद्ध, लहान मुलांना आधिक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकप्रतिनिधी, संघटनांकडून डोळेझाक
जालना रोड अथवा इतर रस्त्यावर अपघात झाला आणि त्यात बळी गेला की लोकप्रतिनिधी, संघटना जाग्या होतात आणि आंदोलने करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात.
दोन-चार दिवस प्रसिद्धी मिळाली की, पुन्हा हे सर्व सुस्त होतात आणि परिस्थिती जैसे थे होऊन आणखी एका अपघातास निमंत्रण मिळते. केवळ ‘चमकोगिरी’ करण्यासाठीच संघटना व लोकप्रतिनिधी आवाज उठवित असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या आहेत.
अपघात घडण्यापूर्वी अतिक्रमणांसह इतर समस्या मार्गी लावण्यासाठी आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे.

अतिक्रमणधारकांना पालिकेचे अभय
जालना रोड, भाजी मंडई, नगर रोडसह शहरातील अंतर्गत छोट्या-मोठ्या रस्त्यांवर सर्रासपणे हातगाड्यावाल्यांसह धनदांडग्यांनी अतिक्रमणे केली आहेत.
ही अतिक्रमणे हटविण्यास पालिकेकडून ‘अर्थ’पूर्ण दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमणांची संख्या वाढत असल्याचे दिसते.

जिल्हाधिका-यांच्या आदेशाला केराची टोपली
शहरातील विस्कळीत वाहतूक पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी शहरातील बंद सिग्नल तत्काळ सुरू करण्याच्या सुचना नगर पालिकेला दिल्या होत्या.
परंतु पालिकेने त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसते. अद्याप एकही सिग्नल सुरू झालेले दिसत नाही. यामुळेच शिवाजी चौक, साठे चौक व इतर ठिकाणी वाहने सुसाट जात आहेत. यामुळे अपघात घडत असल्याचे दिसते.

Web Title: Disrupted traffic in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.