शेतकरी, हमाल, मापाडी, व्यापाऱ्यांना मास्क, सॅनिटायझरचे वाटप - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:09+5:302021-06-16T04:45:09+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी, हमाल आणि मापाडी बांधवांना ...
अंबाजोगाई :
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शेतकरी, व्यापारी, हमाल आणि मापाडी बांधवांना ८ जून रोजी मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले, अशी माहिती अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक गोविंदराव देशमुख यांनी दिली.
मंगळवारी बाजार समितीच्या कार्यालयात आ. संजय दौंड, माजी आ. पृथ्वीराज साठे, अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक गोविंदराव देशमुख, अमर देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, व्यापारी प्रकाश सोळंकी, संचालक शेख अब्रार, विलास मोरे, दत्तात्रय यादव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कैलास गायकवाड, जावेद शेख, सुधाकर जोगदंड आदी उपस्थित होते.
बाजार समितीच्या आवारात विनामास्क येणारे व सॅनिटायझर न वापरणाऱ्या अशा सुमारे ५ हजार लोकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे. शेतकरी, शेतमजूर, श्रमिक, कामगार, व्यापारी, हमाल आणि मापाडी बांधवांच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच समाजातील विविध घटकांना बांधिलकीतून सहकार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मुख्य प्रशासक देशमुख म्हणाले.
जनतेने नियमित मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीत जाणे टाळावे, त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.