राज्यातील 2 हजार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना किटचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 05:38 PM2023-11-11T17:38:37+5:302023-11-11T17:38:56+5:30
परळीत धनंजय मुंडेंच्या हस्ते गुट्टे कुटुंबास दिले संवेदन किट
परळी : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना विविध शेती आणि संसार उपयोगी साहित्यांचे किट वाटप केले जात आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येत आहे.
धनंजय मुंडे यांच्या सूचने नुसार कृषी मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाने यामध्ये पुढाकार घेतला असून "शेतकरी कुटुंबास मदतीचा हात-संवेदन 2023" असे या उपक्रमाचे नामकरण करण्यात आले आहे.
या किटमध्ये परसबागेतील भाजीपाला बियाणे, नॅनो युरिया,सूक्ष्म मूलद्रव्य तसेच विविध किटकनाशकांचा समावेश आहे. त्याचबरोबर दिवाळी फराळ साठी उपयुक्त साहित्य आणि महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळातर्फे उत्पादित करण्यात येत असणाऱ्या विविध वस्तूंचा समावेश आहे.
परळी तालुक्यातील मालेवाडी गावच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी भास्कर गुट्टे यांच्या कुटुंबियांना ही संवेदन किट धनंजय मुंडे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे, अपर जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, तालुका कृषी अधिकारी अशोक सोनवणे आदी उपस्थित होते.
राज्यातील विविध जिल्ह्यातील 2000 शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना हे किट वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा या प्रमाणे याचे सर्व जिल्ह्यात याचे वितरण होणार आहे. ही किट पूर्णपणे लोकवर्गणीतून देण्यात आली आहे, यामध्ये शासनाचा कोणताही निधी वापरण्यात आलेला नाही.