अपक्ष उमेदवाराचा फोटो अन् चिन्ह दुसरे असलेल्या पॅम्प्लेटचे वर्तमानपत्रातून वितरण; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 07:08 PM2024-11-11T19:08:46+5:302024-11-11T19:09:22+5:30

माजलगाव शहरातील प्रकार, राजकीय पत्रके वाटणे हा दखलपात्र अपराध

Distribution of pamphlets from newspapers with independent candidate's photo and different symbol; Filed a case | अपक्ष उमेदवाराचा फोटो अन् चिन्ह दुसरे असलेल्या पॅम्प्लेटचे वर्तमानपत्रातून वितरण; गुन्हा दाखल

अपक्ष उमेदवाराचा फोटो अन् चिन्ह दुसरे असलेल्या पॅम्प्लेटचे वर्तमानपत्रातून वितरण; गुन्हा दाखल

बीड : माजलगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माधव निर्मळ यांचा फोटो वापरून चुकीचे चिन्ह असलेले पॅम्प्लेट वर्तमानपत्रांतून वितरित करण्यात आले. हा प्रकार माजलगाव शहरात १० नोव्हेंबर रोजी घडला. याप्रकरणी निर्मळ यांनी अतुल सोळंके नामक व्यक्ती आणि छपाई करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात ‘लोकमत’नेदेखील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

माधव अंबादास निर्मळ हे अपक्ष उमेदवार असून, त्यांची निशाणी ‘प्रेशर कुकर’ आहे. तर महादेव सुकदेव निर्मळ हेदेखील अपक्ष असून, त्यांची निशाणी ‘रूम कुलर’ आहे. १० नोव्हेंबर रोजी सकाळी एका अज्ञात व्यक्तीने चुकीच्या पद्धतीने पॅम्प्लेटची छपाई करून त्यावर ‘महादेव अंबादास निर्मळ’ असे नाव लिहून कुलर चिन्ह छापले. त्यावर फोटो मात्र माधव निर्मळ यांचा वापरण्यात आला. हा प्रकार माधव निर्मळ यांचे प्रतिनिधी कल्याण आबूज यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हा प्रकार माधव निर्मळ यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर निर्मळ यांनी माजलगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेत अतुल सोळंके आणि पॅम्प्लेटची छपाई करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती दिली.

‘लोकमत’नेही दाखल केली तक्रार
वर्तमानपत्रातून प्रकाशकाचे नाव नसलेले राजकीय पत्रक तसेच इतर व्यावसायिक पत्रके वितरित करणे, हा प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स कायद्याच्या कलम ३/१२ अन्वये दखलपात्र अपराध आहे. शिवाय निवडणूक कालावधीत हा २२३ भारतीय न्याय संहिता (बीएनएस)प्रमाणे गुन्हा आहे. निवडणूक काळातील अशा कृत्यांमुळे उमेदवाराचे समर्थक व विरोधक यांच्यामध्ये वैर निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास करण्यात यावा, अशी तक्रार ‘लोकमत’तर्फे माजलगाव शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे.

Web Title: Distribution of pamphlets from newspapers with independent candidate's photo and different symbol; Filed a case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.