बीड जिल्ह्यात यंदा स्वस्ताईची ‘संक्रांत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:01 PM2018-01-13T23:01:10+5:302018-01-13T23:21:31+5:30
आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या दरात काहीशी तेजी असलीतरी इतर खाद्यवस्तुंच्या बाबतीत बाजारात स्वस्ताईची संक्रांत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर मागील तीन महिन्यात गुळ आणि साखर आणि चणाडाळीचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांना सणाचा गोडवा साजरा करणे शक्य झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आयात शुल्कात वाढ केल्याने खाद्यतेलाच्या दरात काहीशी तेजी असलीतरी इतर खाद्यवस्तुंच्या बाबतीत बाजारात स्वस्ताईची संक्रांत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळीनंतर मागील तीन महिन्यात गुळ आणि साखर आणि चणाडाळीचे भाव उतरल्यामुळे सर्वसामान्यांना सणाचा गोडवा साजरा करणे शक्य झाले आहे.
आॅक्टोबरमध्ये दिवाळीच्या कालावधीत डाळ , साखर, गुळाच्या दरात तेजीचे वारे होते. मात्र त्यानंतर अडीच- तीन महिने किराणा बाजारात मंदीचे वातावरण होते. प्रत्येक मालाला उठाव कमी असल्याने बाजार सुस्त होता. जानेवारी उजाडल्यानंतर पहिल्या आठवड्यातही हेच वातावरण होते. बुधवारपासून (१० जानेवारी) संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारात वर्दळ दिसून आली.
आॅक्टोबरमध्ये गुळाचे भाव ४५ रुपये किलो होते. हे भाव किलोमागे १५ रुपयांनी उतरले आहेत. किरकोळ बाजारात गुळाचे भाव सध्या ३० रुपये किलो आहेत. तर रसायनविरहित गुळाचे भाव ५० ते ७० रुपये किलोदरम्यान आहेत. संक्रातीच्या काळात मागणी असलेला चिक्कीचा गुळ ५५ रुपये किलो दराने विकत आहे. गुळाप्रमाणेच साखरेची स्थिती झाली आहे. आॅक्टोबरमध्ये ४० हजार रुपये किलो भाव असलेली साखर किलामागे ४ रुपयांनी घसरली आहे. किरकोळ बाजारात ३६ रुपये किलो साखरेचे भाव आहेत.
चणाडाळीचे दर आॅक्टोबरमध्ये ८५ रुपये किलो होते. तीन महिन्यात किलोमागे १५ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या ७० रुपये किलो भाव आहे. चणा बेसनच्या ५० किलो बॅगचे दर ४ हजार ५०० रुपये होते. सध्या या बॅगचे भाव ३००० रुपये आहे. किलोमागे ३० रुपयांनी दर गडगडले आहेत. घरोघरी संक्रांतीला तिळाचे लाडू, पुरणपोळीचा बेत असतो. साखर आणि गुळाचे दर सारखेच असल्याने व चणाडाळीचे भाव कमी असल्याने यंदाची संक्रात गोड झाली आहे.
मागील दोन दिवसांपासून रेडिमेड कपडे, साड्या, वाणाच्या वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होती.
गोडवा कायम : तिळाचे भाव स्थिर
तिळाचे भाव मागील वर्षापासून स्थिर आहेत. १०० ते १२० रुपये किलो तिळाचे भाव आहे. तर साखरतिळाचे भाव ६० ते १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत आहेत. बाजारात तिळाचे आयते लाडू, तीळपापडी, तीळपट्टी, गजक तसेच इतर व्यंजन उपलब्ध असल्याने तिळाचा उठाव दरवर्षीच्या तुलनेत ७० टक्के कमी असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
उसाचे पीक मुबलक आहे. साखर कारखान्यांचे गाळप सुरु आहे. तसेच हरभºयाचे पीक उत्तम आहे. उत्पादन दृष्टीपथात आल्यामुळे सध्या बाजारात हे दर कमी आहेत. संक्रांतनिमित्त बाजारात ग्राहकी नव्हती.
- गंगाबिशन करवा, होलसेल किराणा व्यापारी, बीड