कोरोना लसीकरण, क्षयरोगाच्या कामावरून जिल्हाधिकाऱ्यांकडून डॉक्टरांची कान उघडणी
By सोमनाथ खताळ | Published: August 23, 2022 06:36 PM2022-08-23T18:36:55+5:302022-08-23T18:37:09+5:30
बैठकीत काम सुधारण्याच्या सुचना दिल्यानंतरही बदल न झाल्याने कारवाईचा इशारा
बीड : जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाचा टक्का कमी असल्याने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी मंगळवारी वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा कानउघडणी केली.
१९ जुलै रोजी झालेल्या बैठकीत काम सुधारण्याच्या सुचना दिल्यानंतरही गंगामसला, उजणी आणि ताडसोन्ना आरोग्य केंद्राचे काम न वाढल्याने कारवाईचा इशारा दिला. तसेच क्षयराेग कार्यक्रमात खराब कामगिरी असल्याने वैद्यकीय अधीक्षकांना झापले. दिवसभर ही बैठक चालली. इतर कार्यक्रमांचाही आढावा यात घेण्यात आला.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रौफ शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयवंत मोरे, प्रभारी माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.संजय कदम, प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ.संतोष गुंजकर, डॉ.मनिषा पवार यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती होती.