शासनाने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या इमारतीत मंडलाधिकारी बसेनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:35 AM2021-08-26T04:35:27+5:302021-08-26T04:35:27+5:30
इमारतीची पडझड, भोवती घाणीचा विळखा, पाच वर्षांपासून कुलूपच उघडले नाही नितीन कांबळे कडा : आष्टी तालुक्यातील धामणगाव आणि परिसरातील ...
इमारतीची पडझड, भोवती घाणीचा विळखा, पाच वर्षांपासून कुलूपच उघडले नाही
नितीन कांबळे
कडा : आष्टी तालुक्यातील धामणगाव आणि परिसरातील अनेक गावांच्या जनतेसाठी शासनाच्या विविध महसूल सेवा स्थानिक पातळीवरच मिळाव्यात, यासाठी मंडल अधिकारी यांचे कायमस्वरूपी कार्यालय लाखो रुपये खर्च करून थाटले आहे. पण, येथील कार्यालय इमारत पूर्ण होऊनही, तेथे कामकाज सुरू न होता इमारतीच्या अवतीभोवती कचरा आणि घाण साचली आहे. इमारतीची आता पडझड सुरू होऊन इमारतीला उतरती कळा आली आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
अद्याप या इमारतीचे कुलूपच उघडले नसल्याने मंडलाधिकारी हे अद्याप एकदाही या खुर्चीवर बसले नसल्याने हे कार्यालय बकाल बनले आहे.
मंडलाधिकारी कार्यालयातून मिळणाऱ्या प्रशासकीय सेवा स्थानिक पातळीवरच मिळाव्यात, जनतेची गैरसोय होऊ नये, त्यांना तातडीने सेवा मिळाव्यात, त्यांना तालुक्याला येण्याचा आर्थिक भुर्दंड बसू नये, यासाठी शासनाने मोठा निधी खर्च करून अद्ययावत अशी मंडल अधिकारी कार्यालयाची इमारत बांधली आहे. इमारतीचे काम पूर्ण होऊन जवळपास पाच वर्षे होऊन देखील या इमारतीत कामकाज सुरू केलेले नाही.
सर्वसामान्य जनतेचा थेट संबंध येणारे शासकीय कार्यालय म्हणून मंडलाधिकारी कार्यालयाकडे पाहिले जाते. शेतीसंबंधी महत्त्वाची कामे, आपत्कालीन परिस्थितीत पंचनामे, विधवा, परित्यक्ता, निराधार, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना अनेक कामांसाठी मंडल कार्यालयात हेलपाटे घालावे लागतात. धामणगाव येथील कार्यालयात कामकाजच सुरू न केल्याने जनतेला आपली कामे करताना मोठा त्रास होतो. त्याचबरोबर बांधून पूर्ण असलेली इमारत घाणीच्या विळख्यात पडली आहे. तिची पडझड होऊ लागली आहे. येथे शासकीय कार्यालय थाटायचे नव्हते, तर शासनाने लाखो रुपये खर्च करून इमारत बांधली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या मंडल कार्यालयात कामकाजास सुरुवात केल्यास धामणगाव आणि परिसरातील अनेक गावांच्या जनतेची मोठी गैरसोय थांबेल. इकडे मंडलाधिकारी देखील फिरकत नाहीत, याकडे तहसीलदार यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर कार्यालय सुरू करावे व कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ससाणे यांनी केली आहे.
याबाबत आष्टी येथील तहसीलदार शारदा दळवी यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, येथील मंडलाधिकारी कार्यालय अद्ययावत महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आले नसून लागूनच घाणीचा विळखा असल्याने मंडलाधिकारी बसत नसल्याचे त्यांंनी सांगितले.