जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळा लांबणीवर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:29 AM2018-09-04T01:29:02+5:302018-09-04T01:29:24+5:30
बीड : उद्यावर येऊन ठेपलेल्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कारासाठी निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या संबंधित २१ शिक्षकांच्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तसेच आयुक्तांची अनुमती या प्रक्रिया सुरू आहेत. २४ तासात या प्रक्रिया पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नसल्याने ५ सप्टेंबरचा शिक्षक सत्कार सोहळा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून बीड जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी शिक्षकांना जिल्हा पुरस्कार दिले जातात. जिल्हा पुरस्कारासाठी माध्यमिक विभागातून १०, प्राथमिक विभागातून ११ आणि विषय शिक्षकांमधून एक अशा २२ शिक्षकांची निवड करण्यात येत आहे. यावर्षी ७३ प्रस्ताव आले होते. या प्रस्तावांची पडताळणी शुक्रवारी एकाच दिवशी शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
२४ आॅगस्ट रोजी या प्रस्तावांची वस्तुनिष्ठ पडताळणी शुक्रवारी एकाच दिवशी ३२ शिक्षण विस्तार अधिकाºयांकडून करण्यात आली. त्यानंतर हे प्रस्ताव निवड समितीकडे पाठविण्यात आले. गुणवत्तेच्या आधारे निवड करण्याचे धोरण समितीने ठरविले होते. जि. प. पदाधिकारी आणि जि. प. प्रशासनाकडून अंतीम यादी तयार झाली. मात्र ही यादी तयार होण्यास विविध कारणामुंळे उशीर झाला.
पुरस्कारासाठी निवडलेल्या यादीनुसार संबंधित शिक्षकांचे पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर शिक्षकांचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्याची प्रक्रिया असतो.
तत्काळ चारित्र्य प्रमाणपत्रासाठी गृह विभागाच्या पीसीएस प्रणालीअंतर्गत माहिती अपलोड केल्यानंतर संबंधित शिक्षकाच्या निवासी भागातील पोलीस ठाण्याकडून अनुमतीनंतर प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेला किमान आठवडा लागतो. त्यामुळे जिल्हा शिक्षक पुरस्कार कार्यक्रम पुढे ढकलावा लागणार आहे.
योग्य व्यक्तीचा सन्मान होणार
जिल्हा परिषदेत उत्कृष्ट अध्यापन करणारे अनके कृतीशील शिक्षक आहेत. सर्वांनाच पुरस्कार देवू शकत नाही. योग्य व्यक्तीचा सन्मान होणार. काही कारणांमुळे जिल्हा शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. लवकरच तारीख जाहीर होईल.
- राजेसाहेब देशमुख, शिक्षण सभापती, जि. प. बीड.
‘मुहूर्त’ टळण्याची दाट शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार ३ सप्टेंबर रोजी शिक्षकांच्या चारित्र्य प्रमाणपत्रांबाबत पत्र पोलिस विभागाला मिळाले आहे. त्यामुळे ४ सप्टेंबरपर्यंत या प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य असल्याने गुरूजींच्या सत्कारासाठी ‘शिक्षक दिना’चा मुहूर्त टळण्याची दाट शक्यता आहे. सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर कार्यक्रम १७ सप्टेंबरपर्यंत होऊ शकतो, असे सूत्रांकडून समजते.