जिल्हा शिक्षक पुरस्काराचा यंदाही मुहूर्त लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:35 AM2021-09-03T04:35:50+5:302021-09-03T04:35:50+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी होणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळा यंदाही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. ...
बीड : जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी होणारा जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळा यंदाही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. गतवर्षी कोविडमुळे हा सोहळा झाला नाही. यंदा कोरोनाची लाट ओसरली असली तरी पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावांची छाननी व त्यानंतर विभागीय आयुक्तांची परवानगी आदी सोपस्कर पाहता हा सोहळा लांबणीवर पडणार आहे.
जिल्हा शिक्षण विभागाकडून दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील समितीकडून पात्र ठरलेल्या शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविले जाते. जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून शिक्षकांचे प्रस्ताव मागविले होते. हे प्रस्ताव जिल्हा निवड समितीकडे आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली. यंदा जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी १०० प्रस्ताव आल्याची माहिती मिळाली आहे. यातून ११ प्राथमिक , १० माध्यमिक व एक विशेष अशा २२ शिक्षकांना जिल्हा शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण सभापती, समाज कल्याण सभापती, महिला बालकल्याण सभापती, डीएड महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांची जिल्हा निवड समिती पडताळणी केल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे हा प्रस्ताव मंजुरीला पाठविला जातो.
आयुक्तांची मान्यता, सोपस्करासाठी लागणार वेळ
जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी अंतिम यादी निश्चित झाली असली तरी आयुक्तांची परवानगी आणि चारित्र्य प्रमाणपत्र व इतर सोपस्कर पार पाडण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळा होण्याची शक्यता कमीच असल्याचे समजते.
कोरोनाचाही अडसर
गत वर्षी कोरोनामुळे जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळा होऊ शकला नाही. तर २०१९ मध्ये प्रस्ताव मागविण्यात आले होते मात्र निवड समितीचा निर्णय लांबला होता. यावर्षी कोरोनाची लाट असल्यामुळे पाच सप्टेंबरला जरी जिल्हा शिक्षक पुरस्कार सोहळा कार्यक्रम होणार नसला तरी तो १७ सप्टेंबर रोजी नक्कीच होईल अशी शिक्षकांना खात्री वाटत आहे.