विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी केली बीड जिल्ह्यातील पिक नुकसानीची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 01:46 PM2019-11-02T13:46:03+5:302019-11-02T13:49:15+5:30
शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा अधिकाऱ्यांपुढे मांडल्या
बीड : जिल्हयात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मका व इतर खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव व इतर ठिकाणी बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी आ.लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, व संबंधित कृषी व महसूल अधिकारी यांची उपस्थिती होती.
दरम्यान पाण्यात भिजलेली बाजरी, सोयाबीन, कापूस पिकांची पाहणी करून आयुक्त केंद्रेकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांनी देखील आपल्या व्यथा अधिकाऱ्यांपुढे मांडल्या. तसेच तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत विमा योजनेचा लाभ देण्याची मागणी केली आहे.
तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना
विभागीय आयुक्त सुनिल केंदेकर यांनी गेवराई तालुक्यातील रेवकी, देवकी, संगमजळगावं येथील पिकांची बांधांवर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी महसूल व कृषी अधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे,आ.लक्ष्मण पवार,नामदेव टिळेकर, तहसीलदार धोंडिबा गायकवाड, कृर्षी अधिकारी संजय ढाकणे, गटविकास अधिकारी के.एम. बागुल,नायब तहसिलदार अशोक भंडारी, मंडळ अधिकारी सुनिल ताबांरे, जितेंद्र लेंडाळ, निशांत ठाकुर आदींची उपस्थिती होती.