दिव्यांग साथी ऑनलाइन नोंदणीचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:35 AM2021-02-20T05:35:46+5:302021-02-20T05:35:46+5:30
गेवराई : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या समाजकल्याण विभाग बीड, केशवरावजी धांडे मतिमंद विद्यालय तलवाडा,व दिव्यांग विकास फाउंडेशनच्या ...
गेवराई : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या समाजकल्याण विभाग बीड, केशवरावजी धांडे मतिमंद विद्यालय तलवाडा,व दिव्यांग विकास फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग साथी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे. गेवराई शहरातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांनी आपली नोंद करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन समाजकल्याण उपायुक्त सचिन मडावी , मुख्याध्यापक योगीराज काळे व दिव्यांग विकास फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष जे.डी.शाह, दिव्यांग विकास फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष सरफराज पठाण यांनी संयुक्तपणे केले आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे शारीरिक दृष्ट्या व मानसिक दृष्ट्या अपंगत्व असलेल्या दिव्यांगांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने घरकूल योजना, व्यवसाय करण्यासाठी जागा, व्यवसाय करण्यासाठी कर्ज, स्वराज्य संस्थांचा ५% निधी लाभ तसेच तीन चाकी इलेक्ट्रॉनिक सायकल, कानाचे मशीन, अंधांसाठी काठी, कुबड्या इत्यादी साहित्य घरपोच दिले जाणार आहे. तसेच व्यंग व अव्यंग विवाह प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. त्यामुळे दिव्यांगांना इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. तसेच त्यांना स्वावलंबी स्वाभिमानी करण्यासाठी रुपये ३ हजार मासिक लाभ मिळणार आहे.
यासाठी जिल्हा समाजकल्याण विभागातर्फे शहरातील दिव्यांग जनांची संपूर्ण माहिती ऑनलाईन नोंदणी करुन डाटा तयार करण्यात येणार आहे. दिव्यांग साथी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दिव्यांगाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट फोटो, मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय प्रमाणपत्र इत्यादी गरज भासणार आहे तरी शहरातील दिव्यांग जनांनी या मोहिमेत नोंदणी करुन केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा जास्तीत जास्त सहभाग घेऊन लाभ घेण्यासाठी नि:शुल्क निराधार सहाय्यता केंद्र कोल्हेर रोड येथे संपूर्ण साधावा असे आवाहन दिव्यांग विकास फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष जे.डी.शाह ,प्रकल्प संचालक तथा दिव्यांग विकास फाउंडेशन जिल्हाध्यक्ष सरफराज पठाण यांनी केले आहे.