‘लाल परी’च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिखट?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 07:36 PM2020-10-29T19:36:41+5:302020-10-29T19:38:25+5:30
कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळेना
- सोमनाथ खताळ
बीड : दिवाळी अवघ्या पंधरवड्यावर आली असतानाही महाराष्ट्रात राज्य परिवहन महामंडळाकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्यापही ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन अदा झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वेतन नसल्याने यंदाची दिवाळी तिखट जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रात जवळपास ३ हजार अधिकारी व १ लाख ३ हजार कर्मचारी रापमच्या आस्थापनेवर आहेत. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे लालपरी जागेवरच थांबली होती. त्यातच सध्याही बस धावत असल्या तरी भीतीपोटी प्रवासी बसकडे येत नाहीत. त्यामुळे उत्पन्नात अद्यापही वाढ झालेली नाही. याचा फटका अधिकारी, कर्मचाऱ्यांना बसत आहे. लॉकडॉऊन काळात मार्च, ते जुलै महिन्यातील वेतन कसेबसे शासनाने दिले असले तरी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेली नाही. संघटना, कर्मचारी याबाबत वारंवार शासनाकडे मागणी करीत आहेत; परंतु अद्याप तरी याला यश आलेले नाही. वेतन नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे दिसत आहे. दरम्यान, दिवाळी हा सण अवघ्या १५ दिवसांवर आला आहे. याच्या खरेदीला अनेकांनी सुरुवातही केली; परंतु रापम अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय याला अपवाद आहेत. डिसेंबर २०१९ पासून वाढीव ५ टक्के महागाई भत्ता लागू केलेला आहे. तसेच २०१८ व १९ ची वाढीव २ टक्के तीन महिन्यांची थकबाकीही अद्याप मिळालेली नाही.
ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन अदा करणे बाकी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरूच आहे.
-बी. एस. जगनोर, नियंत्रक
वेतनाबाबत वारंवार आवाज उठवला आहे. शासन, प्रशासन स्तरावर भेटी घेतल्या जात असून, दिवाळीपूर्वी वेतनाची मागणी आहे. ते न दिल्यास २ ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार.
-अशोक गावडे, सचिव, कामगार संघटना