अनोळखींना मोबाइल देऊ नका, क्षणात बँक खाते होऊ शकते साफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:38 AM2021-08-21T04:38:48+5:302021-08-21T04:38:48+5:30
बीड : अनोळखी माणसाने कॉलसाठी मोबाइल मागितल्यास देऊ नका. या माध्यमातून ओटीपी मिळवून बँक खात्यातील जमा रक्कम ...
बीड : अनोळखी माणसाने कॉलसाठी मोबाइल मागितल्यास देऊ नका. या माध्यमातून ओटीपी मिळवून बँक खात्यातील जमा रक्कम क्षणात गायब केली जाऊ शकते. अशा प्रकारे फसवणूक झाल्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्यक आहे.
आजघडीला जवळपास प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आहे. तसेच मोबाइल नंबर हा बँक खात्याशी जोडलेला आहे. ऑनलाइन पद्धतीने पैशाचे व्यवहारदेखील मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. या व्यवहारांमध्ये पारदर्शकता असावी यासाठी ओटीपीचा वापर केला जातो व तो शेअर न करण्याची सूचनादेखील दिली जाते. दरम्यान, अनोळखी व्यक्तीच्या हातात मोबाइल दिल्यानंतर त्यावरून ओटीपीचा गैरवापर करत बँक खात्यातील पैसे गायब केले जाऊ शकतात.
ओटीपी मिळविण्यासाठी अशी केली जाऊ शकते फसवणूक
कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन
अनोळखी व्यक्ती कॉल करण्यासाठी मोबाइल घेऊन ओटीपी मिळवू शकतो.
वेगळी लिंक पाठवून
तुमच्या मोबाइलवर मेसेजद्वारे वेगळी लिंक पाठवून ओटीपींची मागणी केली जाते.
लॉटरी लागली आहे असे सांगून
तुम्हाला लॉटरी लागली आहे आणि त्यासाठी ओटीपी सांगा, अशी बतावणी केली जाते.
केवायसीसाठी आवश्यक असे सांगून
केवायसीसाठी ओटीपी आवश्यक असल्याचे सांगून खात्यातील रक्कम हडप केली जाते.
ही घ्या काळजी
१ आपला ओटीपी कोणतीही बँक किंवा शासकीय अधिकारी कधीच मागत नाहीत. त्यामुळे ओटीपी कोणालाही देऊ नका.
२ बँकेतील रकमेवर वक्रदृष्टी ठेवून असलेले ठग लाखों रुपयांचे आमिष दाखवून बँक डिटेल्स, ओटीपीची मागणी करतात. अशावेळी त्यांना प्रतिसाद देऊ नका.
३ एखादी अडचणीत असलेली अनोळखी व्यक्ती फोन लावण्यासाठी मोबाइल मागत असेल तर, त्याच्या प्रत्येक हालचालीवर पूर्णत: लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
मोबाइलच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक केली जाते. त्यासाठी विविध प्रकारचे हातखंडे या ठगांकडून वापरले जातात. त्यामुळे नागरिकांनी बँकेच्या संदर्भातील माहिती फोनवर देऊ नये तसेच ओटीपी व इतर माहिती कोणालाही सांगू नये. कायम सावधगिरी बाळगावी.
- आर.एस. गायकवाड,
सायबर सेल प्रमुख