ऊसदर जाहीर केल्याशिवाय गळीत चालू करू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 11:47 PM2019-11-21T23:47:37+5:302019-11-21T23:48:07+5:30
जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या ऊस पट्यातील सर्वच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी सन २०१९-२० च्या ऊसगळीत हंगामाची जोरदार तयारी केली आहे.
बीड : जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या ऊस पट्यातील सर्वच सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी सन २०१९-२० च्या ऊसगळीत हंगामाची जोरदार तयारी केली आहे. अद्याप कोणत्याही साखर कारखान्यांनी आपला ऊस दर निश्चित केला नाही.
केंद्र शासनाच्या निर्धारित एफआरपी नुसार ऊस दर निश्चित केल्याशिवाय गळीत हंगाम चालू करू नये अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी ऊस वाहतूक रोखून आक्र मक आंदोलन छेडतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, गेवराई तालुकाध्यक्ष राजेंद्र डाके पाटील, रेवकी सर्कल प्रमुख बळीराम शिंदे, पाचेगाव सर्कल प्रमुख उद्धव साबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना २१ रोजी लेखी निवेदन देऊन दिला आहे.
वास्तविक पाहता ऊसउत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी अधिक २०० रु . दर मिळणे आवश्यक असून ते अद्याप मराठवाड्यातील साखर कारखाने देण्यास सर्रास टाळतात. ऊसदर नियंत्रण अध्यादेश १९६६ प्रमाणे १४ दिवसांत संबंधित शेतकºयांना ऊसबिल बँक खात्यात जमा करावे लागते.
विहित मुदतीत ऊसबिल न दिल्यास सदर कायद्यानुसार थकीत रकमेवर १५ टक्के विलंब व्याज द्यावे लागते. मात्र सदर कायद्याची पायमल्ली होत असल्याने याप्रकरणी कडक कायदेशीर कारवाई करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साखर आयुक्त, प्रादेशिक साखर संचालक, जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार निवेदन, आंदोलन करून विनंती केली आहे. मात्र याबाबतीत प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने साखर कारखानदारांवर कायद्याचा वचक बसत नाही परिणामी ऊस उत्पादक शेतक-यांचे कोट्यवधी रु पयांचे प्रचंड नुकसान होत आहे.
हे थांबवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बीडचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी २१ रोजी निवेदन देऊन २०१९-२० च्या ऊस गळीत हंगामासाठी बीड जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांनी केंद्र शासनाच्या निर्धारित एफआरपी नुसार ऊसदर निश्चित करूनच आपला गळीत हंगाम सुरू करावा अशी मागणी केली आहे. तसेच २०१७-१८, १८्-१९ मधील थकीत रकमेचे १५ टक्के विलंब व्याज संबंधित शेतक-यांना तात्काळ अदा न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ३० नोव्हेंबरनंतर संपूर्ण ऊस वाहतूक रोखून बीड जिल्ह्यात आक्र मक आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.