'हताश होऊ नका, हे शेतकऱ्यांचे सरकार'; खा. प्रीतम मुंडेंचा बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 03:51 PM2022-10-20T15:51:09+5:302022-10-20T15:54:02+5:30
सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. प्रीतम मुंडे यांनी दिले.
- अविनाश कदम
आष्टी (बीड) : तालुक्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून मागिल १० ते १५ दिवसांपासून जोरदार कोसळधाराने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले. अद्याप ही आष्टी तालुक्याची पाठ सोडायला पाऊस तयार नाही पांढरी, सोलेवाडी, आष्टा महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. जमिन खरडून पिके वाहून गेली आहेत. शेत जलमय झाले असून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या नुकसानीची खा. प्रीतम मुंडे यांनी आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांनी हताश न होता आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नये, सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे खा. मुंडे यांनी सांत्वन केले.
तालुक्यात परतीच्या पावसाने झोडपून काढले असून पांढरी, सोलेवाडी येथील नदीला पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या नदीकाठच्या जमिनी व चांगल्या प्रकारच्या जमिनी ही खरडून गेल्या हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून संकटात सापडले आहेत.नदी नाल्या दुथडी भरून वाहत आहेत.पिके पाण्यात आहेत.दुबार पेरणीच्या संकटात शेतकरी आहेत. बळीराजाचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागाची खा. प्रीतम मुंडे यांनी आज दुपारी १२ दरम्यान पांढरी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतातील सोयाबीनची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला व तुटलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच नुकसानीचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसिलदार विनोद गुंडमवार यांना सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खा. मुंडे यांनी दिले.
या पाहणी दौऱ्यात मा.आ. भीमराव धोंडे, विजय गोल्हार, अजय धोंडे, सागर धस, अमोल तरटे, पं.स.सदस्य रावसाहेब लोखंडे,दिलीप हंबर्डे, उपविभागीय अधिकारी कुदळे साहेब, तहसिलदार विनोद गुंड्डमवार, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, कृषी अधिकारी गोरख तरटे, युवराज वायबसे,रघुनाथ शिंदे, तात्या कदम , केशव बांगर,सरपंच राहुल काकडे,सुधिर पठाडे, जालिंदर वांढरे, बाळासाहेब नागरगोजे यांच्या सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची सांत्वन पर भेट
आष्टी तालुक्यातील पांढरी येथील दादासाहेब वांढरे या शेतकऱ्यांने अतिवृष्टीने नुकसान झाल्याने आत्महत्या केली होती त्यांच्या कुटुंबांची खा. मुंडे यांनी सांत्वन पर भेट घेऊन शेतक-यांनो हताश होऊ नका हे सरकार शेतकऱ्यांचे असून तुमच्या पाठीशी आहे. शेतक-यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन शेतकऱ्यांना केले.