सरकारी दवाखान्यात खासगी डॉक्टर पैसे घेऊन करतात प्रसूती? तक्रारदारांवर दबावाचा प्रयत्न
By सोमनाथ खताळ | Published: August 23, 2022 12:13 PM2022-08-23T12:13:14+5:302022-08-23T12:14:34+5:30
कुटुंबकल्याण शस्त्रक्रियासाठी आलेल्या महिलांची बाहेरून तपासणी करण्यास सांगून पैसे घेतले होते.
बीड : सामान्यांना मोफत उपचार देणाऱ्या सरकारी दवाखान्यातच लूट सुरू झाली आहे. खासगी डॉक्टरांना बोलावून घेत पैसे देऊन प्रसूती केली जात असल्याचा प्रकार वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी दुपारी घडला. याप्रकरणात नातेवाइकांनी अगोदर नगराध्यक्ष पती शेषेराव जगताप यांना सांगितले. त्यांनी डीएचओकडे तोंडी तक्रार केली. परंतु, कारवाईची टांगती तलवार दिसताच डॉक्टरांनी सारवासारव करत नातेवाइकांवर दबाव आणत हे प्रकरण दडपल्याचा आरोपही जगताप यांनी केला. दरम्यान, यापूर्वीही असे अनेकदा घडल्याचे जगताप यांनी म्हटले आहे.
वडवणी आराेग्य केंद्र यापूर्वीही वादात सापडले होते. कुटुंबकल्याण शस्त्रक्रियासाठी आलेल्या महिलांची बाहेरून तपासणी करण्यास सांगून पैसे घेतले होते. हे प्रकरण लक्षात येताच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी वडवणीत धाव घेतली. सर्वांचे पैसे परत देण्यात आले. तसेच यापुढे असे प्रकार केल्यास कारवाईचा इशाराही दिला होता. हे प्रकरण विसरत नाही तोच पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. वडवणीपासून जवळच असलेल्या मैंदा येथील एका २० वर्षीय महिलेला प्रसूतीसाठी रविवारी सकाळी ६ वाजता आरोग्य केंद्रात दाखल केले. दुपारी १२.४६ मिनिटांनी या महिलेनी मुलीला जन्म दिला. परंतु, ही प्रसूती करण्यासाठी शहरातीलच एका ‘बड्या’ डॉक्टरला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी रुग्णांकडे पैशांची मागणीही केली. परंतु, परिस्थिती हलाखीची असल्याने या रुग्णाच्या नातेवाइकांनी नगराध्यक्ष पती शेषेराव जगताप यांना प्रकार सांगितला. त्यांनी डीएचओ डॉ. गिते यांना कळविले. यात आपला भांडाफोड होणार या भीतीने डॉक्टरांनी नातेवाइकांवर दबाव आणला. त्यामुळे आता ते भीतीपोटी बोलत नसल्याचे जगताप यांनी सांगितले. तर दुसऱ्या बाजूला लेखी तक्रार नसल्याचे कारण देत आरोग्य विभागही हातावर हात देऊन बसल्याचे दिसत आहे. नातेवाईक जरी शांत असले तरी याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून हाेत आहे.
अधिकारी काय म्हणतात...
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते म्हणाले, मला कॉल आला होता. मी आमच्या टीएचओंना खात्री करण्यास सांगितले होते. त्यांनी चौकशी केली असता प्राथमिकदृष्ट्या तसे काही नाही, असे दिसते. परंतु, तक्रार आल्यास चौकशी केली जाईल. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर निपटे म्हणाले, मी प्राथमिक चौकशी केली असता तसे काही वाटत नाही. आणखी चौकशी सुरूच आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब तांदळे व डॉ. अरुण मोराळे म्हणाले, असा काहीही प्रकार नाही. प्रसूती आम्हीच केली आहे. खासगी डॉक्टर कोणीही आले नव्हते, असे सांगितले.
दबाव आणला जात आहे
हा प्रकार खरा असून डीएचओंनाही बोललो आहेत. आता नातेवाइकांवर दबाव आणला जात आहे, त्यामुळे ते घाबरले आहेत. यापूर्वीही अनेकदा असे प्रकार घडले आहेत. रुग्ण कल्याण समितीची बैठक घेऊन निधीचा उपयोग रुग्णांच्या सेवा, सुविधांसाठीच करा, असे सांगितले होते. परंतु, लगेच असे घडले. आता यापुढे असे होऊ नये, यासाठी बारीक लक्ष ठेवू. मी बोललो हीच तक्रार समजावी.
-शेषेराव जगताप, नगराध्यक्ष पती, वडवणी.