दररोज घरच्या घरी करा सहा मिनिटे वॉक टेस्ट !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:09+5:302021-04-20T04:35:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत आहेत. अशातच काही लोकांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रुग्णालयात खाटा अपुऱ्या पडत आहेत. अशातच काही लोकांच्या मनात संशय वाढत आहेत. हे दूर करण्यासाठी घरच्या घरी सहा मिनिटे चालून वॉक टेस्ट करता येऊ शकते. या चाचणीत सर्व चांगले असेल तर आपणाला त्रास नाही, असे समजावे आणि काही त्रुटी जाणवल्या तर तात्काळ रुग्णालयात भरती व्हावे. दम, धाप लागत असलेल्या लोकांनी ही चाचणी करू नये, असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.
कोरोनाच्या काळात आपल्या फुप्फुसाचे आरोग्य व्यवस्थित आहे का, याची परीक्षा घेण्यासाठी ही एक सोपी पद्धत आहे. सहा मिनिटे चालूनही रक्तातील ऑक्सिजनची पातळी काहीच कमी होत नसेल तर आरोग्य उत्तम समजावे. तसेच ६० वर्षांवरील व्यक्तींनी सहाऐवजी ३ मिनिटे चालून चाचणी करू शकता. हे करताना एक केअर टेकर सोबत असेल तर चांगले असते, कारण दम अथवा धाप लागली तर ही व्यक्ती तुम्हाला आधार देईल. त्यासाठी सर्वांनीच घरीच ही पद्धत अवलंबण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
अशी करा चाचणी
आपल्याला बोटाला पल्स ऑक्सिमीटर लावून त्यावर दिसणाऱ्या रक्तातील ऑक्सिजनच्या पातळीची नोंद करावी. नंतर पल्स ऑक्सिमीटर बोटाला तसाच ठेवून घरातल्या घरात घड्याळ लावून सहा मिनिटे स्थिर गतीने वॉक करावा. नंतर पुन्हा ऑक्सिमीटरवरील नोंद घ्यावी.
...तर घ्या काळजी
सहा मिनिटे चालल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी झाली तर...चालणे सुरू करण्यापूर्वीच्या पातळीपेक्षा चालणे झाल्यानंतर ही पातळी तीनपेक्षा अधिकने कमी झाली तर...चालल्यानंतर धाप येणे दम लागल्यासारखे होत असेल तर...तातडीने डॉक्टरांना दाखवावे.
कोणी करायची ही टेस्ट?
सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनाची लक्षणे असतील तर... गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांनी दररोज ही चाचणी करावी.
सहा मिनिटे चालून आपण घरच्या घरी आपण चाचणी करू शकतो. एवढे चालूनही ऑक्सिजनची पातळी ९३ पेक्षा कमी असेल, चालल्यानंतर दम, धाप लागत असेल तर आपल्याला ऑक्सिजन कमी पडतो, असा अर्थ होतो. असे होत असेल तर तात्काळ रुग्णालयात भरती व्हावे. ६० वर्षांवरील व्यक्तींनी ६ ऐवजी ३ मिनिटे चालून चाचणी केली तरी चालते.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड