हुंडा मुलांना घ्यायचा असतो की, मुलांच्या आई-वडिलांना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:36 AM2021-09-25T04:36:06+5:302021-09-25T04:36:06+5:30
हव्यास सुटेना : आठ महिन्यांत ३०१ विवाहितांचा हुंड्यासाठी छळ बीड: हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, लग्नसोहळ्यात ...
हव्यास सुटेना : आठ महिन्यांत ३०१ विवाहितांचा हुंड्यासाठी छळ
बीड: हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, लग्नसोहळ्यात हुंड्याचा हव्यास सुटत नसल्याचे चित्र आहे. आठ महिन्यांत ३०१ विवाहितांचा हुंड्यासाठी छळ केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हुंडा देण्या-घेण्यास वधू-वरांपेक्षा त्यांचे आई-वडीलच अधिक इच्छुक असतात.
लग्न जमविताना वधू-वरांची पसंती झाल्यानंतर विषय येतो तो हुंड्याचा. हुंडा ठरल्याशिवाय लग्न मुहूर्त निश्चित होत नाही. हुंडा ही कुप्रथा आहे. मात्र, ही प्रथा अजूनही हद्दपार झालेली नाही. कुटुंब व नवरदेवाच्या ‘‘स्टेटस’’वरून हुंड्याचे आकडे ठरतात. हुंडा घेण्यास व देण्यास तरुण - तरुणी इच्छुक नसतात. मुलांना हुंडा नाही, तर पत्नी हवी असते आणि मुलींना हुंडा न घेता जोडीदार मिळावा, असे वाटते. मात्र, हुंड्याचा हव्यास मुलांच्या आई-वडिलांना सुटता सुटत नाही, असे पाहावयास मिळते. मुलगी चांगल्या घरात जावी, यासाठी पैशांची जमवाजमव करून हुंड्याची अपेक्षा पूर्ण करण्याकडे वधुपित्याचा कल असतो.
--
मुलांच्या मनात काय?
हुंडा आणि लाच यात फारसा फरक नाही. मुलगी आई- वडिलांना सोडून नव्या घरात येते, नव्या परिवाराशी जुळवून घेत संसार करते, हेच खूप आहे. हुंड्यापेक्षा होणारी पत्नी किती गुणवान, सुशिक्षित व संस्कारी आहे, हे पाहिले पाहिजे.
- एक तरुण
--
हुंडा ही समाजाला लागलेली कीड आहे. ती संपुष्टात आली पाहिजे. त्यासाठी तरुणांनी हुंडा घेणार नाही, असा संकल्प केला पाहिजे. हुंडा न घेता लग्न करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन म्हणून उपक्रम राबविले पाहिजेत.
- एक तरुण
--
मुलांच्या पालकांना काय वाटते? मुलाचे लग्न करताना अनेक अडचणी येतात. मुली भेटत नाहीत, स्थळ आले तर मुलगी पसंत पडत नाही. त्यामुळे हुंड्यासाठी अडून बसण्याचे दिवस आता राहिले नाहीत.
- पालक
---
अनेकदा मुलगी एकुलती एक आहे, तिचे लग्न थाटामाटात लागले पाहिजे यासाठी वधुपक्षाकडील मंडळी स्वत:हून हुंडा किंवा चीजवस्तू देतात. शिवाय संसारोपयोगी साहित्य देण्याचीही प्रथा आहे.
.....
मुलींच्या मनात काय? आई - वडिलांना सोडून नवीन घरात येताना दडपण असते. नव्या कुटुंबात जुळवून घेताना कसरत करावी लागते. त्यात हुंड्यासाठी अडवणूक होत असेल, तर पुढे संसार टिकतो की नाही, याचीही भीती असते.
- एक तरुणी
--
मुलींनी हुंडा न मागणाऱ्या मुलाशीच लग्न करण्याची तयारी दर्शवली पाहिजे. हुंडा मागणारे कुटुंब लोभी असू शकते. सुनेला पैशासाठी घराबाहेर काढणे, तिचा अनन्वित छळ करणे या घटना मनाला वेदना देतात.
- एक तरुणी
--
मुलींच्या पालकांना काय वाटते? ऐपत नसतानाही वरपक्षाकडील मंडळींचे सगळे लाड पुरवावे लागतात. हुंडा एकदा देऊन समाधान होत नाही, तर वारंवार पैशांची मागणी होते. त्यातून छळ, हुंडाबळीच्या घटना घडतात. त्यामुळे सतत काळजी वाटते.
- पालक
--
सुनेला लेकीप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. तिचा हुंड्यासाठी छळ करणे माणुसकीला न शोभणारे आहे. मुलीचे वडील म्हणून कायमच ते मदतीला उभे असतात, पण वरपक्षाकडील अपेक्षा अवाजवी असतात.
- पालक
--
जिल्ह्यात हुंड्याच्या छळाच्या तक्रारी... २०१९ २६६ २०२० २५५ २०२१ ३०१ ....
हुंडाविरोधी कायदा काय आहे? १९६१ मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष चीजवस्तू, स्थावर किंवा जंगम मालमत्ता देणे अगर कबूल करणे. या कायद्याच्या कलम ३ नुसार हुंडा घेणाऱ्यास ५ वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.
....