डॉक्टरला खंडणी मागितली; न्यायालय आदेशाने गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:50 AM2019-01-24T00:50:33+5:302019-01-24T00:50:53+5:30
सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने डॉ. यशवंत राजेभोसले यांच्या फिर्यादीवरून बाजीराव उर्फ बंडू खंडागळे (रा. मालीपारगाव) याच्या विरु द्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शासनाचे नियम डावलून सेवाभावी संस्था उभी केली, संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या महाविद्यालयाचे बांधकाम अनिधकृत असल्याची तक्रार मागे घेण्यासाठी सात लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने डॉ. यशवंत राजेभोसले यांच्या फिर्यादीवरून बाजीराव उर्फ बंडू खंडागळे (रा. मालीपारगाव) याच्या विरु द्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील डॉ. यशवंत राजेभोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रीतसर कागदपत्रांची पूर्तता करून गुरु कृपा सेवाभावी संस्था उभा केली. या संस्थेमार्फत मालीपारगाव शिवारात औषध निर्माण शास्त्र पदविका, पदवी महाविद्यालय चालविण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु असून ते नियमानुसार करण्यात येत आहे. असे असताना बाजीराव खंडागळे हा संस्था व बांधकाम अनधिकृत असल्याची धमकी देत आहे. माहिती अधिकारात माहिती मागून तुमच्या विरोधात तक्र ार करणार आहे. यासाठी मला सात लाख रुपये द्या, पैसे दिले नाही तर तुमच्याविरुद्ध अट्रोसिटीची केस करील अशी धमकी दिली. त्यामुळे डॉ. राजेभोसले यांनी बाजीराव खंडागळे विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. यामुळे डॉ. राजेभोसले यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी (२२ जानेवारी) बाजीराव खंडागळे विरुद्ध खंडणी मागणे, फसवणूक, खोट्या केसेसची धमकी दिल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे हे करीत आहेत.