डॉक्टरने मागितले दोन लाख; कोरोनाबाधिताने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:31 AM2021-05-22T04:31:04+5:302021-05-22T04:31:04+5:30
बीड : अगोदरच दीड लाख रुपये भरले. त्याची एकही पावती दिली नाही. नंतर पुन्हा डॉक्टरने दोन लाख रुपये भरण्यास ...
बीड : अगोदरच दीड लाख रुपये भरले. त्याची एकही पावती दिली नाही. नंतर पुन्हा डॉक्टरने दोन लाख रुपये भरण्यास सांगितले. एवढे पैसे आणायचे कोठून, म्हणून कोरोनाबाधित रुग्णाने चक्क रुग्णालयातच गळफास घेतला. ही घटना बीड शहरातील दीप हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. दीप हॉस्पिटलमधील डाॅक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले होते. त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातही धाव घेतली होती. उशिरापर्यंत यावर निर्णय झालेला नव्हता.
रामलिंग सानप (रा. तांदळ्याचीवाडी, ता. बीड) असे मृत रुग्णाचे नाव आहे. सानप हे १३ मे रोजी कोरोनाबाधित आढळले होते. तत्काळ ते दीप हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. वेगवेगळ्या तपासण्यांच्या नावाखाली त्यांच्याकडून आतापर्यंत एक लाख ६० हजार रुपये वसूल करण्यात आले होते. त्यात केवळ १० हजार रुपयांचे बिल हातावर टेकविल्याचा नातेवाइकांनी आरोप केला. एवढे पैसे भरूनही आणखी दोन लाख रुपये भरा म्हणून रुग्णाला निरोप दिला. एवढे पैसे आणायचे कोठून याच विवंचनेतून सानप यांनी रुग्णालयातीलच जिन्याला रुमालाने गळफास घेऊन जीवन संपविल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.
दरम्यान, दीप हॉस्पिटलने पोलिसांना कळविताच बीड शहराचे पोलीस निरीक्षक रवी सानप हे पथकासह दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदन करायचे की नाही, यावरून आरोग्य विभाग व पोलिसांची चर्चा सुरूच होती. यावर उशिरापर्यंत निर्णय झालेला नव्हता.
हा रुग्ण १३ मे रोजी दाखल झाला. तेव्हापासून १७ मेपर्यंत त्यांनी एक रुपयाही भरला नाही. रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये होता. त्यामुळे शासनाच्या नियमानुसार चार हजार रुपये खाटाचे आणि ६०० रुपये पीपीई किट असे बिल असते. त्यामुळे जास्तीत जास्त ४० हजार रुपयांपर्यंत बिल होईल. दोन लाख रुपये मागण्याचा काहीच संबंध येत नाही. रुग्णाने आत्महत्या केली तेव्हा आमचा स्टाफ दुसरा रुग्ण तपासत होता.
- डॉ. शशिकांत दहिफळकर, दीप हॉस्पिटल, बीड
पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला. आत्महत्या असल्याने शवविच्छेदन करावे लागेल. तरीही मृत कोरोनाबाधित असल्याने वरिष्ठ व आरोग्य विभाग यांच्याशी संवाद साधून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
रवी सानप, पोलीस निरीक्षक, बीड शहर
कोट
शवविच्छेदन करायचे की नाही, याबाबत मार्गदर्शक सूचना तपासल्या जात आहेत. तसेच वरिष्ठांशी चर्चा केली जात आहे.
डॉ. सूर्यकांत गित्ते, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड
===Photopath===
210521\21_2_bed_1_21052021_14.jpg
===Caption===
कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्यानंतर बीड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.