भर दुपारी ढोसली दारू अन् सर्जनची सटकली; सहकाऱ्यांना शिवीगाळ, बीडमधील प्रकार
By सोमनाथ खताळ | Updated: February 6, 2023 20:45 IST2023-02-06T20:44:56+5:302023-02-06T20:45:06+5:30
धाब्यावर बसून दारू पितानाचा कथीत व्हिडीओ व्हायरल

भर दुपारी ढोसली दारू अन् सर्जनची सटकली; सहकाऱ्यांना शिवीगाळ, बीडमधील प्रकार
बीड : जिल्हा रूग्णालयातील एका वरिष्ठ सर्जनने भर दुपारी दारू ढोसली. त्यानंतर सहकारी डॉक्टर व वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा एक कथीत व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या प्रकाराने आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन झाली असल्याने संबंधित डॉक्टरला नोटीस बजावल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी दिली.
येथील जिल्हा रूग्णालयात उच्च पदावर एक सर्जन कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया न केल्याने आणि मागील आठवड्यात एका दिव्यांग प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या रूग्णाला गरज नसताना रेफर केल्याने ते वादात सापडले होते. या प्रकरणात त्यांना नोटीसही बजावली आहे. याचा खुलासा देण्याआधीच या सर्जनचा आणखी एक करनामा समोर आला आहे. बार्शी रोडवरील एका बिअर बारमध्ये बसून दिवसभर दारू ढोसली. त्यानंतर फोन करून सहकारी डॉक्टरांना शिवीगाळ केली. तसेच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही शिव्यांची लाखोली वाहिली. सहकारी डॉक्टरांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच घरी जाण्याचा सल्ला दिला, परंतू त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. दरम्यान, धाब्यार बसून दारू पितानाचा एक कथीत व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. याची गंभीर दखल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांनी घेतली असून संबंधित डॉक्टरला नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराने मात्र, आरोग्याची प्रतिमा मलीन झाली असून सोमवारी दिवसभर आरोग्य विभागात याची चर्चा सुरू होती.
डॉक्टर्स ग्रुपवरून पेटला वाद
जिल्हा रूग्णालयातील शासकीय डॉक्टरांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे. याच ग्रुपवर संबंधित सर्जनने मेसेज पाठविले. यात अनेकांचे नाव होते. येथे कोणी उत्तर न दिल्याने या सर्जनने फोन करून शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. याची अद्याप तरी पोलिसांत नोंद झालेली नाही. तसेच सर्जनला याबाबत विचारले असता मी माफी मागितली असून अशा चुका होतच असतात, असे सांगून त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
सरकारी नोकराने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालणे चुक आहे. याचा एक कथीत व्हिडीओ मला मिळाला आहे. सहकाऱ्यांसह वरिष्ठांना शिवीगाळ केल्याचेही समजले आहे. ही बाब आरोग्याची प्रतिमा मलीन करणारी आहे. याबाबत संबंधिताला नोटीस बजावणार असून शिस्तभंगासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार आहे. डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड