आरोपीने कोठडीबाहेर उपचार घेतल्याचा प्रकार डॉक्टरने वरिष्ठांपासून लपविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 06:19 PM2019-01-08T18:19:27+5:302019-01-08T18:23:16+5:30
हा सर्व प्रकार डॉक्टरने वरिष्ठांपासून लपविला आहे. त्यामुळे या प्रकरणाशी डॉक्टरांचाही संबंध असल्याचे बोलले जात आहे.
बीड : लाच प्रकरणातील आरोपीने कोठडीबाहेर उपचार केल्याचा प्रकार माध्यमांनी समोर आणला. ही बाब पोलीस व डॉक्टरांच्या संगनमताने झाल्याचे पुढे येत आहे. मी फक्त उपचार केले. नंतर तो रूग्ण बाहेर होता की कोठडीत, असे सांगत डॉक्टरनेही हात झटकले आहेत. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार डॉक्टरने वरिष्ठांपासून लपविला आहे. त्यामुळे या प्रकरणाशी डॉक्टरांचाही संबंध असल्याचे बोलले जात आहे.
न्यायालयीन कोठडी झालेल्या आरोपीच्या छातीत दुखू लागल्याने त्याला रविवारी सायंकाळी पाच वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल केले. वॉर्ड क्रमांक ६ मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र येथील सुरक्षा रक्षकांनी दुजाभाव करीत एका आरोपीला कोठडीत तर दुसऱ्याला बाहेर सर्वसामान्याप्रमाणे ठेवल्याचे सोमवारी समोर आले होते. याबाबत पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना माहिती होताच त्यांनी पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता संबंधित पोलीस सुरक्षा रक्षकांची चौकशीही सुरू झाली आहे.
दरम्यान, हा आरोपी बाहेर ठेवल्यामुळे बाजूच्या रूग्णांमध्ये भितीचे वातावरण होते. आपण केवळ उपचार करतो, त्यांना राखन बसत नाही, असे सांगत वॉर्ड प्रमुख डॉ.बाळासाहेब टाक यांनी हात झटकले आहेत. आपण ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर संबंधिताला कोठडीत ठेवल्याचे त्यांनी सांगितले. मात्र तब्बल १९ तास बाहेर असलेला आरोपी डॉ.टाक यांना कसा दिसला नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. ही बाब त्यांनी वरिष्ठांपासून लपविल्याचेही समोर आले आहे. या सर्वप्रकरणात आता पोलिसांसह संबंधित डॉक्टरही दोषी असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी चौकशी सुरू केली, मात्र आरोग्य विभागाने अद्याप यावर कसलीच कारवाई केलेली नाही.
आरोग्य विभाग प्रकरणाबाबत गंभीर नाही
एक आरोपी इतर रूग्णांप्रमाणे कोठडीबाहेर उपचार घेत आहे. सुदैवाने काही दुर्दैवी घटना घडली नाही. मात्र जर घडली तर याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतरही आरोग्य विभागाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले. एखादी घटना घडल्यावर वरिष्ठ कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात असून सर्वच संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
डॉक्टरांनी कल्पना दिली नाही
आरोपी कोठडीबाहेर राहून उपचार घेत असल्याचे समजताच मी सुचना करून त्यास आत ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे ठेवलेही होते. संबंधित डॉक्टरांनी याबाबत मला कल्पना दिली नव्हती.
- डॉ.सुखदेव राठोड, अति.जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
निदर्शनास आणून दिले होते
मी उपचार करतो. राखन नाही बसत. हा प्रकार समजताच तो निदर्शनास आणून दिला.
- डॉ.बाळासाहेब टाक, वैद्यकीय अधिकारी, वॉर्ड क्र. ६