मोबाइल टॉर्च लावून डॉक्टर पोहोचले फडात; गरोदर मातांसह मजुरांची तपासणी
By सोमनाथ खताळ | Published: December 2, 2024 08:33 AM2024-12-02T08:33:23+5:302024-12-02T08:33:47+5:30
गरोदर मातांना काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करून औषधेही दिली. गेवराई तालुक्यातील रेवकी व बाग पिंपळगावच्या सीएचओंसह त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील मजूर ऊस तोडणीसाठी आलेले आहेत. ते सकाळी लवकर जाऊन रात्री उशिरा आपल्या राहायच्या ठिकाणी येतात. दिवसभर भेट होत नसल्याने आरोग्य विभागच त्यांच्याकडे गेला. रात्री १० वाजेपर्यंत माेबाइल टॉर्च लावून मजुरांवर उपचार केले.
गरोदर मातांना काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करून औषधेही दिली. गेवराई तालुक्यातील रेवकी व बाग पिंपळगावच्या सीएचओंसह त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
जिल्ह्यातील माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून केले जात असलेले हे प्रयत्न लक्षणीय ठरत आहेत.
दोन गरोदर माता अति जोखमीच्या
सात गरोदर मातांची पथकाने तपासणी केली. यात दोन जणी अतिजोखमीच्या आढळल्या. त्यांचे वजन व इतर तपासणी करण्यात आल्या. त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणले जाईल.
आरोग्याची काळजी
गेवराई तालुक्यातील तलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत रेवकी व बाग पिंपळगाव हे दोन उपकेंद्र येतात. रेवकी अंतर्गतच हिंगणगाव, गोंदी, संगम जळगाव व इतर दोन अशी पाच गावे येतात. या गावांमध्ये सध्या ऊसतोडणीसाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह राज्य व राज्याबाहेरील मजूर आलेले आहेत.
त्यांच्या आरोग्य तपासणीच्या सूचना होत्या; परंतु दिवसभर ते उसाच्या फडातच असायचे, त्यामुळे त्यांची भेट होत नव्हती. मग डॉक्टरांचे पथक थेट मजुरांच्या भेटीला गेले.
काही ठिकाणी रुग्णवाहिका जात नव्हती तर मोबाइलच्या उजेडात ते त्यांच्यापर्यंत पोहोचले. गरोदर माता, लहान मुले यांच्यासह इतर मजुरांची आरोग्य तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले.