मुली होतात म्हणून डॉक्टर पतीकडून पत्नीसह मुलीला जाळण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:33 AM2021-01-25T04:33:44+5:302021-01-25T04:33:44+5:30
बीड : 'तुला मुलीच होतात, मुलगा का होत नाही म्हणत डॉक्टर असलेल्या पतीने चार महिन्यांच्या तान्ह्या मुलीसह पत्नीला अंगावर ...
बीड : 'तुला मुलीच होतात, मुलगा का होत नाही म्हणत डॉक्टर असलेल्या पतीने चार महिन्यांच्या तान्ह्या मुलीसह पत्नीला अंगावर रॉकेल ओतून जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या विवाहितेने पळ काढला व स्वत:ला वाचविले. ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे घडली. केज तालुक्यातील सारोळा येथील माहेरी ती आली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
केज तालुक्यातील सारोळा येथील प्रियंका ढाकणे यांचा कळंब येथील विशाल प्रल्हाद घुगे याच्याशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. पहिल्यांदा मुलगी झाल्याने प्रियंकाला घरात सासरच्याकडून मुलासाठी त्रास दिला जात होता. दरम्यान, पुन्हा एकदा प्रियंका गरोदर राहिल्यानंतर आता तरी मुलगा होईल, या अपेक्षेने सासरच्या मंडळीकडून त्रास कमी झाला. त्यानंतरदेखील दुसरी मुलगी झाल्याने तेव्हापासून पती आणि सासरच्या मंडळीकडून तुला मुली का होत नाहीत, असे म्हणत मारहाण, शिवीगाळ करून शारीरिक, मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. घरात कोणी नीट बोलत नव्हते. 'जेवण करत असतानाही पोटभर जेवण देत नव्हते. माझ्या पहिल्या मुलीलाही त्रास देत होते व आता चार महिन्यांच्या मुलीलादेखील त्रास देत आहेत, अशी प्रियंका यांची तक्रार आहे.
शुक्रवारी रात्री प्रियंका यांच्या घरात भांडण झाले. त्यावेळी पतीने त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या व लहान मुलीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काडेपेटी भिजल्याने दुसरी शोधेपर्यंत त्या ठिकाणावरून त्यांनी पळ काढला. चार महिन्यांची मुलगी मात्र कळंब येथील घरीच असल्याचे त्यांनी सांगितले. तिच्यादेखील जीवाला धोका असल्याचे त्यांच्या माहेरच्यांनी सांगितले.
पीडितेचा पती विशाल प्रल्हाद घुगे, त्याची बहीण आणि मामा हे सर्व मिळून मुलगीच का झाली म्हणून सतत त्रास देत होते. दरम्यान, कळंब येथून पळ काढल्यांतर त्या केज तालुक्यातील सारोळा येथे घरी आल्या, दरम्यान, मारहाण केल्यामुळे त्यांना वेदना सहन होत नव्हत्या. त्यामुळे शनिवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मुली झाल्यामुळेच सासरच्यांकडून त्रास दिला जात आहे, असे विवाहितेची आई आशाबाई ढाकणे यांनी सांगितले.