रुग्णावर उपचार करण्यास डॉक्टरांची टाळाटाळ; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 06:41 PM2018-08-27T18:41:47+5:302018-08-27T18:42:50+5:30
वरिष्ठांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत काही डॉक्टर रुग्णांना तुच्छ वागणूक देत उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
बीड : येथील जिल्हा रुग्णालयाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. वरिष्ठांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत काही डॉक्टर रुग्णांना तुच्छ वागणूक देत उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहेत. आज दुपारी एकच्या सुमारास अपघात विभागातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्ण न पाहताच औषधी लिहून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारला होता. सुरक्षित मातृत्व अभियानसह इतर उपक्रमांमध्ये जिल्हा रुग्णालय अव्वल राहिले. त्यामुळे प्रतिमाही उंचावली होती. राज्यात जिल्ह्याचे नाव झाले. परंतु मागील काही दिवसांपासून कारभार जैसे थे झाल्याचे पाहवयास मिळत आहे. नियमित डॉक्टर शिकाऊ डॉक्टरांवर जबाबदारी सोपूवन इतरत्र फिरत असल्याचा प्रकार समोर आला होता. यावर उपाययोजना होत नाही तोच पुन्हा एकदा अपघात विभागातील एका डॉक्टराने रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ केली. विनंती केल्यानंतर संबंधित डॉक्टरने रुग्ण न पाहताच रागाच्या भरात औषधी लिहून वॉर्ड क्रमांक ८ मध्ये दाखल होण्यास सांगितले. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याने सदरील रुग्णाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे रितसर तक्रार केली आहे.
रुग्णालयाची प्रतीमा मलीन
दरम्यान, मागील काही दिवसांपासून अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे. याला केवळ कामचुकार डॉक्टरच जबाबदार आहेत. काही डॉक्टर मात्र प्रामाणिकपणे सेवा देत असल्याचे दिसून येते. रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
कारवाई केली जाईल
रुग्णांवर उपचार करण्यात टाळाटाळ केली असेल तर तात्काळ चौकशी करुन कारवाई केली जाईल. दर्जेदार व तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. काही डॉक्टरांकडून असे प्रकार होत असतील तर कोणासही पाठिशी घातले जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल.
- डॉ. अशोक थोरात,जिल्हा शल्यचिकित्सक, बीड