माजलगाव धरणात ३४ तासानंतर डॉक्टरांचा मृतदेह सापडला; शोध घेणाऱ्या NDRF जवानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 19:00 IST2022-09-19T18:58:57+5:302022-09-19T19:00:01+5:30
बचाव पथके व स्थानिक मच्छीमार तरुणांच्या शोधमोहीमेस यश न आल्याने आज कोल्हापूर येथून 11 जणांच्या एनडीआरएफ पथकास पाचारण करण्यात आले.

माजलगाव धरणात ३४ तासानंतर डॉक्टरांचा मृतदेह सापडला; शोध घेणाऱ्या NDRF जवानाचा मृत्यू
माजलगाव : येथील माजलगाव धरणात रविवारी बुडालेल्या डॉ. दत्तात्रय श्रीमंत फपाळ यांचा मृतदेह 34 तासानंतर आज सायंकाळी 5 वाजता पाण्यातून काढण्यात बचाव पथकांना यश मिळाले. दरम्यान, या शोधकार्यात एनडीआरएफच्या एका जवानाचा बुडून मृत्यू झाला.
माजलगाव येथील डॉ.दत्तात्रय श्रीमंत फपाळ हे रविवारी माजलगाव धरणात पोहायला गेले असताना परत येत आसतांना त्यांना दम लागुन त्रास होऊन त्यांचा बुडुन मृत्यू झाला होता. मात्र, त्यांचा मृतदेह सापडला नसल्याने बीड, परळी व माजलगाव कारखान्याच्या बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. बचाव पथके व स्थानिक मच्छीमार तरुणांच्या शोधमोहीमेस यश न आल्याने आज कोल्हापूर येथून 11 जणांच्या एनडीआरएफ पथकास पाचारण करण्यात आले.
दरम्यान, एनडीआरएफ जवानांनी पाण्यात मृतदेहाचा शोध घेत असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास दोन जवान पाण्यात उतरले. खाली शोध घेत असताना मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यात पाय अडकून दोन जवान फसले. त्यातील शुभम काटकर याला बाहेर काढण्यात यश आले तर राजशेखर मोरे यास वाचवत असतांना त्याचे ऑक्सिजन सिलेंडर निसटल्याने तो पाण्यात बुडाला.
जवळपास एक तास झाला तरी तो बाहेर आला नसल्याने या घटनेची तहसीलदार वर्षा मनाळे, विभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना माहिती दिल्यानंतर स्वतः शर्मा हे घटनास्थळी आले. जिल्हाधिकारी शर्मांनी बोटीत बसून धरणात बचावकार्याची माहिती घेतली. अखेर दुपारी दिडच्या सुमारास मच्छीमारांच्या लावलेल्या गळास मोरे यांचा देह लागला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर ही बचाव पथक व मच्छीमारांच्या टीमने शोध कार्य सुरूच ठेवले होते. अखेर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास डॉ. दत्तात्रय फपाळ यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यास यश मिळाले.