डॉक्टरच उठलेत जिवावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:49 AM2019-02-21T00:49:33+5:302019-02-21T00:49:54+5:30
रूग्णालयातून निघालेले बायोमेडिकल वेस्टेज नालीत टाकल्याप्रकरणी बीड पालिकेने कृष्णा हॉस्पिटलला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात रूग्णालयांकडूनच प्रदूषण करून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर केला जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. रूग्णालयातून निघालेले बायोमेडिकल वेस्टेज नालीत टाकल्याप्रकरणी बीड पालिकेने कृष्णा हॉस्पिटलला पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. १० महिन्यांतील ही तिसरी कारवाई आहे. वारंवार कारवाया करूनही डॉक्टर याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. यावरून डॉक्टरच नागरिकांच्या जिवावर उठल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
रूग्णालयातून निघालेले बायोमेडिकल वेस्टेज हे ठरवून दिलेल्या संस्थेच्या घंटा गाडीत टाकणे बंधनकारक आहे. त्याची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक असते. मात्र बीडमधील काही रूग्णालये सर्रासपणे वेस्टेट उघड्यावर टाकतात. त्यामुळे जनावरांसह मनुष्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. असे असतानाही रूग्णायांकडून काळजी घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी शिवाजीनगर भागातील विद्यानगरातील कृष्णा हॉस्पिटलमधील बायोमेडिकल वेस्टेज नालीत टाकताना पालिका अधिकाऱ्यांना दिसले. त्यांनी तात्काळ धाव घेत डॉ. मनोज मुंडे यांना पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरे अधिनियम १९९५ चे कलम ३२२ अन्वये ‘घनकचरा व्यवस्थापन व साफसफाई नियोजन’ यासाठीच्या उपविधीनुसार ही कारवाई केल्याचे स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी.तिडके यांनी सांगितले.
ही कारवाई उपमुख्याधिकारी राहुल साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व्ही.टी.तिडके, स्वच्छता निरीक्षक भागवत जाधव, आर.एस.जोगदंड, भारत चांदणे, महादेव गायकवाड, ज्योती ढाका आदींनी केली. हे पथक नियमित पाहणी व तपासणी करणार असल्याचे सांगण्यात आले.