बीडमध्ये डॉक्टरांची हलगर्जी; रूग्णाच्या मृत्यूने तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 12:20 AM2017-11-30T00:20:43+5:302017-11-30T00:23:05+5:30
डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रूग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात परिसरात आक्रोश केला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली. नातेवाईकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार करून संबंधित डॉक्टर, कर्मचा-यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी तात्काळ समिती नेमण्यात आली आहे.
बीड : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रूग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात परिसरात आक्रोश केला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली. नातेवाईकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार करून संबंधित डॉक्टर, कर्मचा-यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी तात्काळ समिती नेमण्यात आली आहे.
कैलास नरहरी सरवदे (४६ रा.नवा मोंढा, बीड) असे मयत झालेल्या रूग्णाचे नाव आहे. सरवदे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना मंगळवारी रात्री ८ वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कट्टे यांनी त्यांची तपासणी करून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. त्यानंतर काही वेळात लगेच सरवदे यांच्या छातीत दुखू लागले. नातेवाईकांनी डॉ.कट्टे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी तपासले असता फिजिशिअयला कॉल करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे कर्तव्यावर असणारे डॉ. बाळासाहेब टाक यांना रूग्णालयाकडून संपर्क करण्यात आला. परंतु डॉ.टाक तब्बल दीड तास उशिराने रूग्णालयात आल्याचे नातेवाईकांचे म्हणने आहे.
त्यानंतर टाक यांनी तपासणी करून काही औषध बाहेरून आणण्यास सांगितले. काही वेळानंतर सरवदे यांच्या हालचाली बंद झाल्या. पुन्हा टाक यांना बोलाविले असता त्यांनी रूग्णास मयत घोषित केले. वास्तविक पाहता डॉक्टर १० ते १५ मिनीटांत आले असते तर तात्काळ औषधोपचार करून रूग्ण वाचला असता.
तसेच वैद्यकीय अधिकारी यांनीही आपली जबाबदारी झटकून रूग्णाची तपासणी करण्यास दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवार्ईकांनी केला. डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळेच आमचा रूग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत रूग्णालयासमोर ठिय्या मांडला होता.
डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत नातेवाईकांना अश्वासन दिले. बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फिजिशियन डॉ. बाळासाहेब टाक, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कट्टे यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
नातेवाईकांचा संताप : डीएमओंचा काढता पाय
अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सरवदे रूग्णालयात दाखल झाले तेव्हा डॉ.कट्टे हे वैद्यकीय अधिकारी होते. रात्री ९ वाजेनंतर डॉ.राठोड यांची ड्यूटी होती. तर फिजिशिअन म्हणून डॉ.टाक होते. दरम्यान, सरवदे यांना मृत घोषित केल्यानंतर नातेवाईक डॉक्टरांविरोधात आक्रमक झाले. हा संताप पाहून डिएमओ व इतर कर्मचाºयांनी रूग्णालयातून काढता पाय घेतला.
लवकरच अहवाल येईल
सरवदे यांच्या मृत्यूबद्दलत तक्रार आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. लवकरच याचा अहवाल येईल. त्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल.
- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड