'लाखो रूपये वेतन घेणारे डॉक्टर पुन्हा गायब'; बीड जिल्हा शल्यचिकित्सकांचा वचक दिसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 06:41 PM2021-08-11T18:41:20+5:302021-08-11T18:44:56+5:30
Beed Civil Hospital News : डॉक्टर सरकारी रूग्णालय वाऱ्यावर सोडून स्वता:च्या खाजगी रूग्णालयात ठाण मांडतात.
- सोमनाथ खताळ
बीड : जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सुरेश साबळे यांनी पदभार हाती घेतल्यानंतर नॉन कोवीड रूग्णांना उपचार मिळतील, अशी अपेक्षा होती. सुरूवातीला काहीसा फरकही पडला. परंतू आता पुन्हा जैसे थे झाल्याचे दिसते. मानसोपचार विभागातील डॉ.सुदाम मोगले हे रूग्णालयात फिरकत नसल्याचे बुधवारी दुपारी दिसले. त्यामुळे आलेल्या रूग्णांची चिडचिड कमी होण्याऐवजी जास्तच वाढली. कामचुकारपणा पुन्हा सुरू झाल्याने डॉ.साबळेंचा दबाव नसल्याचे सिद्ध होत आहे.
जिल्हा रूग्णालयात बाह्य रूग्ण तपासणीसाठी वेगवेगळे विभाग आहेत. सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात नॉन कोवीड रूग्णांची तपासणी केली जाते. प्रत्येक विभागात लाखो रूपये वेतन असलेले डॉक्टर नियूक्त केलेले आहेत. परंतू हे डॉक्टर सरकारी रूग्णालय वाऱ्यावर सोडून स्वता:च्या खाजगी रूग्णालयात ठाण मांडतात. हे वारंवार समोर आल्यानंतरही जिल्हा शल्य चिकित्सक अथवा इतर अधिकाऱ्यांकडून कसलीच तपासणी केली जात नाही. यावरून या सर्वांची 'अर्थपूर्ण' साखळी असल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी सर्वात महत्वाचा समजला जाणारा मानसोपचार विभाग वाऱ्यावर होता. केवळ तांदळे नामक कर्मचारी या विभागात होते. मानसोपचार तज्ज्ञ डॉ.सुदाम मोगले यांची बुधवारी ड्यूटी होती. परंतू ते गायब होते. तसेच इतर कर्मचारीही उपस्थित नव्हते. अशा कामचुकारांमुळेच सामान्य लोक सरकारी दवाखान्याची पायरी चढत नाहीत. याचा फायदा याच लोकांकडून खाजगी रूग्णालयाच्या माध्यमातून घेतला जात आहे. यात त्रास मात्र, सामान्यांना होत आहे. त्यामुळे अशा कामचुकारांची हकालपट्टी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
आता पुन्हा नोटीसांचा पाहुणचार
तक्रार केली तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे व डॉ.सुखदेव राठोड यांच्याकडून या कामचुकारांना केवळ नोटीस बजावली जाते. त्यांच्याकडून खुलासा आल्यावर तो मान्य करून काहीच कारवाई केली जात नाही. ही बाब आता सर्वांसाठी नवीन नाही. त्यातच डॉ.मोगले हे वरिष्ठ असल्याने सर्वच जण त्यांना आदर देतात. याचाच गैरफायदा ते घेतात. याचा फटका सामान्यांना बसतो.
चमकोगिरी नको, रिझल्ट हवा
डॉ.साबळे यांनी सुरूवातील वारंवार राऊंड घेऊन सर्व डॉक्टर ओपीडीत बसतील असा दावा केला होता. परंतू वारंवार डॉक्टर गायब होत असल्याने त्यांचा दबाव नसल्याचे दिसते. त्यांच्याकडून राऊंड घेऊन कारवाया करण्याच्या धमक्या देऊन चमकोगिरी केली जात आहे. प्रत्यक्षात काहीच फरक पडत नाही. सामान्यांना रिझल्ट हवा असल्याची चर्चा आहे.
काय म्हणतात मानसोपचार तज्ज्ञ
कधी मी तर कधी डॉ.मुजाहेद ओपीडी काढतात. माझ्या मागे इतरही कामे असतात, असे डॉ.सुदाम मोगले म्हणाले. तर डॉ.मुजाहेद म्हणाले मी अपंगाच्या बोर्डात आहे. ओपीडीची सर्व जबाबदारी डॉ.मोगलेंवर आहे.
नॉन कोवीड रूग्णांना सेवा देण्याचे पूर्ण आदेश दिलेले आहेत. डॉक्टर गैरहजर असतील तर तात्काळ सुचना करून कारवाई केली जाईल.
- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड
डॉ.माेगले कसलीही कल्पना न देता गैरहजर आहेत. आता फोन केल्यावर आजारी असल्याचे कारण सांगितले. याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाईल.
- डॉ.राम देशपांडे, स्थलांतरीत जिल्हा रूग्णालय बीड