आजारी सांगून डॉक्टरची सरकारीत रजा; खासगी ओपीडी मात्र जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:38 AM2021-08-20T04:38:37+5:302021-08-20T04:38:37+5:30

सोमनाथ खताळ स्टिंग ऑपरेशन बीड : प्रकल्प प्रेरणा विभागात झालेल्या गैरप्रकारातील मुख्य सूत्रधार असलेल्या मानसोपचारतज्ज्ञाने चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी ...

Doctor's leave on sick leave; Private OPD, however, is loud | आजारी सांगून डॉक्टरची सरकारीत रजा; खासगी ओपीडी मात्र जोरात

आजारी सांगून डॉक्टरची सरकारीत रजा; खासगी ओपीडी मात्र जोरात

Next

सोमनाथ खताळ

स्टिंग ऑपरेशन

बीड : प्रकल्प प्रेरणा विभागात झालेल्या गैरप्रकारातील मुख्य सूत्रधार असलेल्या मानसोपचारतज्ज्ञाने चौकशीच्या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी आजारी असल्याचे कारण सांगत महिनाभर रजा टाकली. घरी आराम करण्याऐवजी या डॉक्टरने स्वत:ची खासगी ओपीडी जोरात सुरू ठेवली आहे. वेड्यांना शहाणे करणाऱ्या डॉक्टरने दिशाभूल करीत आरोग्य विभागालाच वेड्यात काढल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील कंत्राटी डॉक्टरचा हा सर्व कारनामा 'लोकमत'ने बुधवारी स्टिंग ऑपरेशन करून चव्हाट्यावर आणला आहे.

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी स्थापन केलेल्या प्रकल्प प्रेरणा विभागात मानसोपचारतज्ज्ञ म्हणून डॉ. सुदाम मोगले यांची नियुक्ती केली. प्रति महिन्याला ७० हजार रुपये वेतन खर्च केले जाते. समुपदेशन, उपचार आणि नियोजन असे कामही त्यांच्यावर सोपविले. परंतु, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना भेटीसह समुपदेशन कार्यक्रमासाठी त्यांनी तब्बल १२ लाख ६३ हजार रुपयांची उधळपट्टी केली. सर्व बिलांवर डॉ. माेगले यांच्याच स्वाक्षऱ्या आहेत. हा सर्व गैरप्रकार 'लोकमत'ने चव्हाट्यावर आणल्यावर आरोग्य संचालिका डॉ. साधना तायडे यांनी गंभीर दखल घेतली. उपसंचालक डॉ. एकनाथ माले यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी चौकशी केली असता, पुन्हा चार कर्मचारी गैरहजर दिसले. यावर माहिती घेतली असता, चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी डॉक्टरने आजारी असल्याचे कारण देत महिनाभर रजा टाकली. परंतु, त्यांनी आराम करण्याऐवजी आपली खासगी ओपीडी जोरात सुरू ठेवल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशन करून निदर्शनास आणले आहे. आरोग्य विभागाची कशाप्रकारे दिशाभूल केली, हे यातून दिसून येते. आता प्रकल्प प्रेरणा आणि खासगी ओपीडी यामुळे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुदाम मोगले चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

---

आजारी असल्यावर आराम का नाही?

आजारी असल्याने सरकारी ओपीडीत बसले नाहीत. मग, खासगी ओपीडी काढायला येते का? आराम करायचा सोडून खासगीत का बसले? जेवढ्या तळमळीने खासगीत बसतात, तेवढेच सरकारीत का नाहीत बसत? असा सवाल उपस्थित होत आहे. केवळ भेटीच्या नावाखाली १२ लाखांची उधळपट्टी करून कागदोपत्री अहवाल तयार करण्याचा प्रकार केल्याचे सूत्रांनी सांगितले.

---

काही अर्जंट आलेले रुग्ण पाहत असतो. जे मागचे रुग्ण आहेत, त्यांना गोळ्या लिहून द्याव्या लागतात.

- डॉ. सुदाम मोगले, मानसोपचारतज्ज्ञ

---

डॉ. मोगले हे आजारी असल्याचे कारण देत एक महिन्याच्या सुटीवर आहेत. सुटीवर असल्याने आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही.

- डॉ. सुखदेव राठोड, अति. जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

---

आजारी असल्यावर आरामच करायला पाहिजे. असे असेल तर चूकच आहे. आजारी प्रमाणपत्रात संशय आल्यास मेडिकल बोर्डासमोर तपासले जाईल.

- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

190821\19_2_bed_4_19082021_14.jpeg

सरकारीत आजारी असल्याचे सांगून रजा टाकणारे डॉ.सुदाम मोगले स्वता:च्या घरी खाजगी ओपीडी काढताना दिसत आहेत.

Web Title: Doctor's leave on sick leave; Private OPD, however, is loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.