पाणी देता का पाणी...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:41 AM2019-05-25T00:41:51+5:302019-05-25T00:42:24+5:30
जालना : तालुक्यातील पुणेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावात पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. गावात पाणी ...
जालना : तालुक्यातील पुणेगाव येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, गावात पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. गावात पाणी उपलब्ध असतांनाही येथील ग्रामसेवक पाणी सोडत नाही. आम्हाला पाणी द्या, या मागणी पुणेगाव येथील महिलांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्याचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना देण्यात आले.
जालना तालुक्यातील पुणेगावात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. याबाबत ग्रामपंचायत कार्यालयला अनेक वेळा सांगण्यात आले. परंतु, ग्रामपंचायत कार्यालयाने याकडे दुर्लक्ष केले. दरम्यान, गावात विहिर अधिग्रहणाची गरज असतांनाही प्रशासनाने विहिर अधिग्रहण केले नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. येत्या २४ तासात पाण्याची व्यवस्था केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हा परिषद कार्यालय परिसरात महिलांनी हंडा घेवून प्रशासनाचा विरोध केला. यावेळी कारभारी अंभोरे, विमल हाके, सखुबाई करपे, रेखा घुगे, गंगुबाई उगले, कमलबाई जारकड, द्वारका भारकड, शकुंतलाबाई चोरमारे, सुमिनाबाई चोरमारे, केसरबाई चोरमारे यांच्यासह २५ ते ३० महिलांची उपस्थिती होती.
सीईओंच्या कार्यालयासमोर गोंधळ
ग्रामस्थांनी विविध मागण्याचे निवेदन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांना दिले.
निवेदन देतावेळी ग्रामसेवकांनी गावात दररोज पाणी सोडण्यात येत नससल्याचे सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी सीईओंच्या कार्यालयाजवळ गोंधळ केला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करुन ग्रामस्थांना शांत केले.
अध्यक्षांनी केली मध्यस्थी
ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या कार्यालयासमोर गोंधळ केला होता. त्यानंतर जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर यांनी महिलांना कार्यालयात बोलवून पाणी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी सीईओंना बोलवून तात्काळ टँकर सुरु करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी संतप्त महिलांनी आपल्या व्यथा अध्यक्षांसमोर मांडल्या.