घराबाहेर झोपलेल्या २२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:10 AM2019-04-30T01:10:02+5:302019-04-30T01:10:49+5:30

साकूड आणि वरवटी या दोन गावांत रविवारी मध्यरात्री पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल २२ जणांना चावा घेऊन जखमी केले.

Dog bites on 22 people who are sleeping outside the house | घराबाहेर झोपलेल्या २२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा

घराबाहेर झोपलेल्या २२ जणांना पिसाळलेल्या कुत्र्याचा चावा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : तालुक्यातील साकूड आणि वरवटी या दोन गावांत रविवारी मध्यरात्री पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल २२ जणांना चावा घेऊन जखमी केले. हे सर्व व्यक्ती घराबाहेर झोपलेले होते. कुत्र्याच्या हल्ल्यामुळे दोन्ही गावांसह आजूबाजूच्या परिसरात दहशत पसरली आहे.
रविवारी रात्री १२.३० वाजता साकूड गावासह मुलतानी तांडा आणि पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास वरवटी येथे ही घटना घडली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने घरे गरम होत आहेत. खेड्यापाड्यातून अनेकजण रात्रीच्या वेळी घराबाहेर उघड्यावर झोपणे पसंद करतात. मात्र, साकूड आणि वरवटी येथे घराबाहेर झोपणे ग्रामस्थांना चांगलेच महागात पडले. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास साकूड गावात पिसाळलेल्या कुत्र्याने घराबाहेर गाढ झोपलेल्या व्यक्तींना काही कळायच्या आत १५ व्यक्तींना चावा घेऊन जखमी केले. त्यानंतर वरवटी गावातील गणी भागात अशाच प्रकारे धुमाकूळ घालत त्या कुत्र्याने ७ जणांचे लचके तोडले आणि पळून गेला. अन्य ग्रामस्थांनी मध्यरात्रीतून सर्व जखमी व्यक्तींना स्वाराती रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली सर्व जखमींवर उपचार करण्यात आले. ८ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुटी दिली. सर्व जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या पिसाळलेला कुत्र्याचा शोध घेऊन सोमवारी दुपारी ग्रामस्थांनी त्याला ठार मारले. मोकाट कुत्र्यांची समस्या ग्रामीणसह शहरी भागातही आहे. एका कुत्र्याने दोन गावांत धुमाकूळ घातल्याची चर्चा मात्र रंगत होती.
‘बाधित कुत्रे मारण्याची परवानगी द्या’
रविवारी रात्री पिसाळलेल्या कुत्र्याने ग्रामस्थांसह गावातील अनेक जनावरांना आणि इतर कुत्र्यांनाही चावा घेतला आहे.
त्यामुळे गावातील कुत्रे बाधित होऊन पिसाळतील या शंकेने साकूड ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. भविष्यातील धोका लक्षात घेऊन बाधित कुत्रे मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ करू लागले आहेत.
रात्रीतून वेळी-अवेळी विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानेच घराबाहेर झोपावे लागत असल्याचे सांगून ग्रामस्थांनी महावितरणच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला.

Web Title: Dog bites on 22 people who are sleeping outside the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.