प्राण्यांवरील प्रेमाचे अनोखे उदाहरण; अपघातातून बचावलेल्या गायीचे गोशाळेने केले डोहाळ जेवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:02 PM2021-04-03T16:02:21+5:302021-04-03T16:04:00+5:30
पशुप्राण्यांवरही प्रेम करून त्यांना लळा लावून माणुसकी जोपासणाऱ्या या डोहाळजेवणाचा विषय अंबाजोगाई तालुक्यात चर्चिली जात आहे.
अंबाजोगाई : चार वर्षांपूर्वी अंबाजोगाईत एका अज्ञात वाहनाच्या धडकेने बेवारस वासरू गंभीर जखमी झाले होते. त्याला पशु रुग्णालयात नेऊन त्याचे गोशाळेने योग्य संगोपन केले आहे. आज या वासराचे गायीत रुपांतर झाले आहे. ही गाय सात महिन्यांची गाभण आहे. यामुळे गोशाळेने या गायीचे डोहाळ जेवण केले. या डोहाळ जेवणाची चर्चा अंबाजोगाई तालुक्यात चांगलीच रंगली आहे.
अंबाजोगाईपासून जवळच असलेल्या वरवटी येथे अॅड. अशोक मुंडे यांची गोशाळा आहे. या गोशाळेत ४० पेक्षा जास्त गायींचे संगोपन केले जाते. लोकसहभागातून मोठ्या मुश्किलीने हे गोशाळा चालते. गोशाळेतील गायींचे संगोपन करण्यासाठी अशोक मुंडे हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. चार वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरातील आंबेडकर चौकात एका वासराला सुसाट वाहनाने धडक दिली. या अपघातात हे वासरू गंभीर जखमी झाले होते. शहरातील सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर सोनवणे यांनी या वासराला तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर हे वासरू वरवटी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे गोशाळेमध्ये दाखल करण्यात आले.
गोशाळेचे संचालक अशोक मुंडे यांनी या वासराचे योग्य संगोपन केले. या वासराचे रुपांतर आज एका सुंदर गायीमध्ये झाले आहे. अपघातातून बचावलेली ही गाय आज सात महिन्याची गाभण आहे. जीवदान मिळालेल्या या गायीचे डोहाळ जेवण गोशाळेत करण्यात आले. यात अशोक मुंडे यांच्यासह परमेश्वर सोनवणे, सतीश जाधव, राहुल नेहरकर यांनी पुढाकार घेऊन डोहाळ जेवणाचा छोटेखानी कार्यक्रम केला. पशुप्राण्यांवरही प्रेम करून त्यांना लळा लावून माणुसकी जोपासणाऱ्या या डोहाळजेवणाचा विषय अंबाजोगाई तालुक्यात चर्चिली जात आहे.