ढोकेश्वर मल्टीस्टेटचा अंबाजोगाईतील ठेवीदारांना धोका; ७३ लाख ५५ हजार हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 08:03 PM2018-05-31T20:03:55+5:302018-05-31T20:03:55+5:30
बीड जिल्ह्यातील जनतेस धोका देऊन लूटणाऱ्या मल्टीस्टेटच्या यादीत आता ढोकेश्वर मल्टीस्टेटचा देखील समावेश झाला आहे.
अंबाजोगाई : बीड जिल्ह्यातील जनतेस धोका देऊन लूटणाऱ्या मल्टीस्टेटच्या यादीत आता ढोकेश्वर मल्टीस्टेटचा देखील समावेश झाला आहे. ‘ढोकेश्वर’ने अंबाजोगाईतील ठेवीदारांना अधिक व्याज दाराचे आमिष दाखवून साडेत्र्याहत्तर लाख रुपये हडप केल्याप्रकरणी ६८ ठेवीदारांनी एकत्रित येत अंबाजोगाई पोलिसात तक्रार दाखल केली. सदर तक्रारीवरून ढोकेश्वरचे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यात मल्टीस्टेटमध्ये अनेक गैरप्रकार घडत आहेत. शुभकल्याण, परिवर्तन या मल्टीस्टेटनी ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये लाट्ल्याची प्रकरणे नुकतीच उघडकीस आली असून जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. हि प्रकरणे ताजी असतानाच आता नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीने ठेवीदारांच्या केलेल्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. दोन वर्षापूर्वी अंबाजोगाई शहरात ढोकेश्वर मल्टीस्टेटची शाखा मोठ्या थाटामाटात सुरु झाली होती.शाखा सुरु होताच या मल्टीस्टेटने जाहिरातबाजीचा धडाका सुरु केला. विविध प्रसार माध्यमांचा वापर करून गुंतवणूकदारांना आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविण्यात येऊ लागले. या अमिषाला भुलून तक्रारदार मधुसूदन रंगनाथ मोरगावकर यांनी ढोकेश्वरमध्ये १२ महिन्याच्या मुदतीसाठी दि. ६ जुलै २०१६ रोजी एक लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली होती. या मुद्दलाला १२ टक्केप्रमाणे १ लाख १४ हजार रुपये ६ जुलै २०१७ रोजी देणे अपेक्षित होते. परंतु, सदरील मल्टीस्टेटच्या कर्मचाऱ्यांनी ठेवीची रक्कम देण्यासाठी टाळाटाळ सुरु केली. कर्मचारी आपली ठेव परत देत नसल्यामुळे मोरगावकर यांनी मल्टीस्टेटच्या संचालक मंडळाकडे तक्रार करून मुदत ठेवी रक्कम देण्यासाठी विनंती केली. परंतु, संचालक मंडळाने देखील या ठेवीदारांना उडवाउडवीची उत्तरे देऊन रक्कम देण्यास टाळाटाळ केली. मोरगावकर यांच्यासारखाच अबुभाव इतर ६७ गुंतवणूकदारांना देखील आल्याने ढोकेश्वरकडून आपली फसवणूक होत असल्याचे या सर्वांच्या लक्षात आले. त्यामुळे एकूण ६८ ठेवीदारांनी एकत्रित येत मधुसूदन मोरगावकर यांच्या नावे अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ढोकेश्वर मल्टीस्टेटचे संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्याविरोधात विरोधात फिर्याद दिली.
मोरगावकर यांच्या फिर्यादीवरून ढोकेश्वर मल्टीस्टेटचे अध्यक्ष सतिश पोटपराव काळे, उपाध्यक्ष भाऊसाहेब इंद्रराव शिदे, संचालक शिवाजी बाबुराव जाधव, भास्कर तुकाराम खुर्दे, रफीक मोहम्मद शेख, नानाराव भाऊराव देशमुख, देवराव नारायण शिदे, रुपा जयवंत राशीनकर, प्रणाली मदन रामोळे, शोभा राजेंद्र शेवाळे , विठ्ठल रंगनाथ वाघ, क्षेत्रीय व्यवस्थापक सुरेश, मारुतीराव काळे, प्रभारी व्यवस्थापक सय्यद लाल तळेगावकर, विपणन अधिकारी ज्ञानोबा लाड, रोखपाल विजय चव्हाण, लिपीक जगन्नाथ उगले, लिपीक कल्पना पांडुरंग पवार, लिपीक ज्योती प्रकाशराव झंवर बागला, लिपीक मनिषा प्रेमनाथ पवार, लिपीक महेश श्रीकृष्ण तोष्णीवाल, माजी क्षेत्रीय व्यवस्थापक सुर्यकांत वैजनाथअप्पा निर्मळे, माजी लिपीक गंगाधर नंदीकोल्हे (सर्व रा. लासलगाव ता. निफाड जि. नाशिक शाखा अंबाजोगाई) यांच्यावर कलम ४०६, ४२०, ३४ भाद्वी प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून याप्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक गजानन तड्से हे पुढील तपास करत आहेत.