दानपेटी फोडणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात; पैसे काढून दानपेटी टाकली विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 04:55 PM2019-05-08T16:55:50+5:302019-05-08T16:58:29+5:30
रोकड घेऊन दुचाकीवरून पळून जात असताना चोरट्याचा झाला अपघात
बीड : केज तालुक्यातील लव्हुरी येथील बडेबाबा मंदिरातील दानपेटी फोडून नगदी रोकड पळवणाऱ्या चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यास केज पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरील चोराने पेटीतील पैसे काढून घेत ती बाजूच्याच एका विहिरीत टाकल्याचे समोर आले आहे.
अविनाश मधुकर कांबळे (२४, रा.लव्हूरी, ता.केज) असे अटक केलेल्या चोराचे नाव आहे. लव्हुरी येथील बडेबाबा मंदिरातील दानपेटी २० एप्रिल रोजी चोरट्याने उचलून इतर ठिकाणी नेवून लोखंडी साहित्याने फोडली. त्यातील नगदी रक्कम व सोन्या चांदीचे दागिने काढून घेत रिकामी दानपेटी कोठी शिवारातील एका विहिरीत फेकून दिली. नगदी रोकड घेऊन दुचाकीवरून पळून जात असताना हा चोरटा केज येथील शिक्षक कॉलनीत दुचाकी घसरल्याने जखमी झाला होता, परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र शुध्दीवर येताच या त्याने रुग्णालयातून पळ काढला होता.
असे असतानाच लव्हुरी गावात बडेबाबा मंदिराची दानपेटी चोरीला गेल्याची जोरदार चर्चा सुरु होती, पण याबाबत फिर्याद देण्यासाठी कोणीच तयार झाले नव्हते. केज ठाण्यात तक्रार नसल्याने पोलिसांनीही तपास केला नाही. दरम्यान दानपेटी फोडणारा आरोपी लव्हुरी येथे असल्याची माहिती मंगळवारी बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली अन पोलिसांनी लव्हुरी येथील चारा छावणीवरुन अविनाश कांबळे यास ताब्यात घेतले.
दानपेटीतील रक्कम काढून घेतली व रिकामी दानपेटी कोठी शिवारात डोंगरे यांच्या पाणी असलेल्या विहिरीत फेकून दिल्याची कबुली त्याने पोलिसांसमोर दिली. याप्रकरणी मंदिराचे पुजारी राजाराम पुरी यांच्या तक्रारीवरून त्याच्यावर केज ठाण्यात कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, विहिरीतील दानपेटी बाहेर काढली जाणार असल्याचे केज पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोह बालाजी दराडे, सखाराम सारूक, अन्वर शेख, जायभाये आदींनी केली.