दात्यांचे योगदान, तालखेडचे शांतिधाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:03+5:302021-09-26T04:36:03+5:30

पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातील दहा हजार लोकसंख्येच्या तालखेडमध्ये स्मशानभूमी काळाची गरज होती. एखादी व्यक्ती मरण पावली तर बाभळीची ...

Donor Contribution, Shantikadham of Talkhed | दात्यांचे योगदान, तालखेडचे शांतिधाम

दात्यांचे योगदान, तालखेडचे शांतिधाम

Next

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : तालुक्यातील दहा हजार लोकसंख्येच्या तालखेडमध्ये स्मशानभूमी काळाची गरज होती. एखादी व्यक्ती मरण पावली तर बाभळीची झाडे तोडण्यापासून जागा स्वच्छ करण्यापर्यंतची सर्व कामे गावकऱ्यांनाच करावी लागत होती. ही मुख्य अडचण लक्षात घेत गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश मुंदडा यांनी स्मशानभूमीचा प्रश्न समोर ठेवला. गावाच्या या सुविधेसाठी हवी ती मदत करण्याची तयारी दर्शविली. जिल्हा परिषदेचे तत्कालीन बांधकाम सभापती युद्धाजीत पंडित यांच्याकडे या प्रश्नाची तीव्रता मांडण्यात आली. त्यांनीही दखल घेत जिल्हा परिषदेच्या दहन व दफन योजनेतून पाच लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. त्याअंतर्गत अंत्यविधी शेड व निवारा शेडचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. परंतु अंत्यविधीची जागा शासकीय मालकीची नसल्यामुळे अधिकृत बांधकाम करण्याची अडचणी होती. त्यामुळे शेड बांधकाम करायचे कोठे, हा प्रश्न होता. ही बाब ओळखून गावातील किसनराव रणंजकर पाटील यांनी रोडलगत असलेली जागा दानपत्र करून स्मशानभूमीसाठी होत असलेल्या गावकऱ्यांच्या प्रयत्नांना बळ दिले. त्यामुळे ठरल्याप्रमाणे कामाला सुरुवात झाली. स्मशानभूमीला सुरक्षा व्यवस्था असावी. त्यामध्ये नीटनेटकेपणा असला पाहिजे, अशी इच्छा जयप्रकाश मुंदडा यांच्या मनात आली. त्यांनी सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांना बोलावून आपली भावना मांडली. दिवंगत वडील स्व. मिठ्ठूलाल मुंदडा यांच्या स्मृतीनिमित्त स्मशानभूमीसाठी पाच लाख रुपये दान करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयाची ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी स्वागत करीत कामाची आखणी केली. स्मशानभूमीसाठी संरक्षण भिंत, कमान, निवारा शेडमधील बैठक व्यवस्था, पेव्हर ब्लॉक, हातपंप आणि परिसरात झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले. या भूमीला शेवटची विश्रांती म्हणून ‘शांतिधाम’ असे नामकरण करण्यात आले. जयप्रकाश मुंदडा यांच्या सकारात्मक विचारांना दाद देत निवृत्त शिक्षक वसंतराव टिळे, रंगनाथराव ठोंबरे व ग्रामस्थही प्रतिसाद देतात. त्यामुळे तालखेडमधील मूलभूत सुविधांना आकार लाभत आहे.

तालखेडला दिशा देणारे जयप्रकाश मुंदडा

गावचे भूमिपुत्र जयप्रकाश मुंदडा यांना १९७१ ते ७४ या कालावधीत शिक्षक म्हणून नवी पिढी घडविण्यासाठी सेवा दिली. परंतु कुटुंब मोठे आणि उत्पन्न पाहता एकट्याने नोकरी करून जमणार नाही, या इच्छेतून भावांना सोबत घेत व्यापार क्षेत्रात पाऊल ठेवले. परंतु शाळा आणि विद्यार्थी यांच्यापासून ते दूर गेले नाहीत. १९८० पासून ५० गरजू शाळकरी मुलांसाठी गणवेश, फी व इतर शैक्षणिक मदत सुरू केली. मदतीच्या या कार्याची माहिती घेत मुंदडा यांची तळमळ लक्षात घेऊन परभणी येथे साने गुरुजी व्याख्यानमालेच्या आयोजकांच्या वतीने सामाजिक कार्यासाठी जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. १९९७ मध्ये एक लाख रुपये देणगी देत आई चंपाबाई मिठ्ठूलाल मुंदडा यांच्या नावाने माजलगावच्या सिद्धेश्वर विद्यालयात बालवाडीचा श्रीगणेशा केला. मुंदडा यांचे दातृत्व इथेच थांबलेले नाही. मागील २० वर्षांपासून दर महिन्याला ३५ ते ४० निराधारांना प्रत्येकी सहा किलो धान्य वाटपाचा मानवतावादी उपक्रम आजतागायत सुरू आहे. दरवर्षी ३० नोव्हेंबरला या निराधारांना वस्त्रदान करीत सामाजिक पातळीवर आधार देतात.

250921\25bed_4_25092021_14.jpg

Web Title: Donor Contribution, Shantikadham of Talkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.