शेतकऱ्याच्या थडग्यावर विकासाची मनोरे उभारू नका : राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 04:49 PM2023-02-14T16:49:07+5:302023-02-14T16:49:47+5:30
समुध्दी महार्गातील बाधित शेतकऱ्यांना वेगळा आणि सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांना वेगळा निधी का ?
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : विकास होऊ द्या, आमचा विरोध नाही. पण आमच्या अन्नात माती कालवू नका. तुम्ही राज्यभर विकासाचे मनोरे बांधा पण त्याखाली आम्हा शेतकऱ्यांची थडगी गाडली जाऊ नयेत, अशी टोकदार भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली. ते कडा येथील शेतकरी आक्रोश मेळाव्यात मार्गदर्शनपर बोलत होते.
सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या आक्रोश मेळाव्याचे आयोजन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कडा येथे करण्यात आले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी, बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, अहमदनगर जिल्हाध्यक्ष लोंढे, रवि मोरे, मंगेश आजबे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना शेट्टी म्हणाले की, पिढ्यानपिढ्या सांभाळलेली जमीन सानाडीत करताना डोक्यावर पाणी आणून जगवलेली झाडे, पाईपलाईन, विहिर, घर याचा देखील विचार करावा. पण याकडे ते दुर्लक्ष करीत असतील तर त्यांची जागा त्यांना दाखवून दिली जाईल. सुसाट वेग असणाऱ्यांसाठी रस्ता आहे. शेतकऱ्यांनी विमान घ्यावे का? आमच्या प्रश्नाची उत्तरे आम्हाला मिळावीत. नवे महामार्ग शेतमाल, जानेयेण्यास अडचणीचे ठरू नयेत. या गोष्टी एकदा तपासून घ्याव्या लागतील. जमीन, झाडे, पाईपलाईन यांची आधी किमत सांगा, मग आम्ही निर्णय घेऊ. जर कोणी सरकारी माणूस दारात आला तर त्याला चोरासारखी वागणूक द्या. पाच जिल्हातील शेतकऱ्यांनी एकजुटीने लढा. तुम्ही सगळे एकत्रीत आला तर सरकारला तुमच्या समोर गुडघे टेकायला लाऊ, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.
निधीत असा भेदभाव का?
समुध्दी महार्गातील बाधित शेतकऱ्यांना वेगळा आणि सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांना वेगळा निधी का ? सगळा पैसा अदानी अंबानीच्या घरात जायला पाहिजे. आम्ही शेतकरी उपाशी राहायला पाहिजे हे सरकारचे धोरण आहे का, असा आरोपही शेट्टी यांनी केला .