सिझर करू नका, साधारण प्रसूतीवर भर द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:37 AM2021-09-18T04:37:21+5:302021-09-18T04:37:21+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयाबद्दल विश्वास वाढवायचा आहे. सर्वात जास्त प्रसूती आपल्या संस्थेत झाल्या पाहिजेत, यासाठी नियोजन करा. आणि हो, ...
बीड : जिल्हा रुग्णालयाबद्दल विश्वास वाढवायचा आहे. सर्वात जास्त प्रसूती आपल्या संस्थेत झाल्या पाहिजेत, यासाठी नियोजन करा. आणि हो, उगाचच सिझरसाठी हट्ट धरू नका, होईल तेवढे साधारण प्रसूती (नॉर्मल डिलिव्हरी) करण्यावर भर द्या, अशा सूचना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी प्रसूती विभागातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना दिल्या. तसेच कोरोना वॉर्डचाही राउंड घेत त्यांनी सूचना केल्या.
जिल्हा रुग्णालयात मागील काही महिन्यांपासून प्रसूतीचा टक्का वाढला आहे. जागेची थोडी अडचण होत असली तरी रुग्णसेवा चांगली मिळत असल्याने सामान्य रुग्ण जिल्हा रुग्णालयाची पायरी चढत आहेत. दिवसेंदिवस विश्वास वाढत असल्याचे दिसत आहे. शुक्रवारी सकाळी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करून डॉ. सुरेश साबळे कोरोना वॉर्डात गेले. सर्व रुग्णांशी संवाद साधत आढावा घेतला. तसेच खाटांचे नियोजन केले. नंतर त्यांनी नॉन कोविड रुग्णालयात रुग्णांच्या फाइल तपासून उपचार योग्य होत आहेत का, याची माहिती घेतली. ज्यांनी चांगले काम केले त्यांचे कौतुक केले तर कामचुकारांची कानउघाडणी केली. परतत असतानाच त्यांनी प्रसूती विभागात जाऊन सीझर, नॉर्मल प्रसूती करण्याबाबत सूचना केल्या. तसेच गर्भवती महिलांशीही संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या.
--
कोविड आणि नॉन कोविड रुग्ण एकाच इमारतीत आले आहेत. त्यामुुळे थोडी जागेची अडचण आहे. असे असले तरी रुग्णसेवेत आम्ही कमी पडत नाहीत. दर्जेदार आणि तत्पर सेवा देण्याबाबत वारंवार सूचना केल्या जातात. तसेच सिझर कमी करून नॉर्मल प्रसूती करण्यावर आमचा जास्त भर असेल. सरकारी रुग्णालयाबद्दल जो विश्वास वाढत आहे, त्यात आणखी भर टाकायची आहे.
डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
170921\17_2_bed_29_17092021_14.jpeg
जिल्हा रूग्णालयात राऊंड घेताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे दिसत आहेत.