'आमची शाळा बंद करू नका, अन्यथा उसतोडणीस जावे लागेल'; विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 01:03 PM2022-10-17T13:03:37+5:302022-10-17T13:04:12+5:30
मुख्यमंत्री साहेब आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल.
किल्लेधारूर (बीड) : जायभायवाडी येथे २० पेक्षा पटसंख्या कमी असल्याने गावातील प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. डोंगर भागातील ऊस तोडणी करणाऱ्यांचे गाव असलेल्या येथील शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांने व्यथित होत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली आहे. उसतोड कामगारांची आहोत, इतर ठिकाणी शाळेत जाणे शक्य नसल्याचे आपल्या पत्रात नमूद केल्याने या पत्रानंतर तरी शिक्षण विभागाला पाझर फुटणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्याच्या शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या २० पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जायभायवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेवरील मुख्याध्यापकाने आपली शाळा आता बंद होणार असे विद्यार्थ्यांना सांगितले. यामुळे व्यथित झालेल्या समाधान बाबासाहेब जायभाये या विद्यार्थ्यांने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून शाळा बंद न करण्याची विनंती केली. दुसऱ्या शाळेत जायचे म्हणजे, छाती इतक्या पाण्यातून रस्ता आहे. आम्ही पहिली दुसरीचे मुले कसे जाणार? शाळा बंद झाली तर आम्ही देखील पालकांसारखे उसतोड मजूर बनू, असेही या विद्यार्थ्याने पत्रात म्हटले आहे. दरम्यान, पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद करण्याच्या निर्णयावर विविध स्तरातून टीका होत आहे. आता या पत्रानंतर शिक्षण विभाग काय निर्णय घेतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.
असे आहे विद्यार्थ्याचे पत्र:
''मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र,
पत्र लिहिल्यास कारण की,
साहेब आमचे सर म्हणाले की, आमची शाळा बंद होणार आहे. जर माझी शाळा बंद झाली तर माझं काय होईल. माझे आईवडील ऊसतोड कामगार आहेत. जर माझी शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला जावे लागेल आणि मी सुद्धा मोठा उस तोड कामगार म्हणून ओळखला जाईल. म्हणून तुम्हाला माझी कळकळीच विनंती आहे की माझी शाळा बंद करू नका. जर माझी शाळा बंद झाली तर आम्हाला दुसऱ्या गावाला शिकायला जावे लागेल. जाताना वाटेत ओढे आहेत आणि त्या ओढ्यात छातीपर्यंत पाणि आते आहे. आम्हाला त्याच पाण्यातून जावे लागेल. आम्ही पहिली दूसरीची मुले आहोत मग आम्ही कसे जायचे. म्हणून माझी तुम्हाला कळकळीची नम्र विनंती आहे की, माझी शाळा बंद करू नका. माझं गाव डोंगरांच्या कुशीत वसलेल आहे.
- समाधान बाबासाहेब जायभाये''