चॅलेंज ट्रेंडला बळी पडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:51+5:302021-02-15T04:29:51+5:30
अंबाजोगाई : सध्या सामाजिक माध्यमातून कपल चॅलेंज किंवा फॅमिली चॅलेंज, सिंगल चॅलेंज, डॉटर चॅलेंज असे ...
अंबाजोगाई : सध्या सामाजिक माध्यमातून कपल चॅलेंज किंवा फॅमिली चॅलेंज, सिंगल चॅलेंज, डॉटर चॅलेंज असे ट्रेन्ड दिसत आहेत. अशा ट्रेंडने प्रभावित होऊन अनेक कुटुंबीय पत्नी, मुलगी यांच्यासोबतचे फोटो व्हायरल करत आहेत. अशा चॅलेंजमुळे फोटोंचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे अशा ट्रेन्डला बळी पडू नका, असे आवाहन येथील पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांनी केले आहे.
नवीन ट्रेंड निघाला की, सर्व जण त्याचे डोळे झाकून अनुकरण करतात. सध्या सामाजिक माध्यमांवर चॅलेंज ट्रेंड सुरू आहे. यातून प्रत्येक जण छायाचित्र व माहिती शेअर करत आहेत. या माध्यमाद्वारे आपल्या कुटुंबीयांची माहिती सायबर गुन्हे, अनैतिक कृत्य करणाऱ्या व्यक्तीला मिळू शकतात. ते हे छायाचित्रांचा गैरवापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. छायाचित्रांचा गैरवापर झाल्यास आपले मानसिक व शारीरिक व आर्थिक नुकसान होऊ शकते. त्यामुळे अशा ट्रेंडला बळी पडू नका. यापूर्वीही समाजमाध्यमांवरील फोटोंचा गैरवापर झाल्याचा अनेकांना मन:स्ताप झालेला आहे. तरीही नागरिक अशा चुकीच्या पद्धतीला बळी पडतात. सोशल मीडियावर कुटुंबातील महिला व मुलींचे फोटो टाकणे टाळा व संभाव्य धोके टाळून सुरक्षित रहा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक सुनील जायभाय यांनी केले आहे.