सत्ता आली म्हणून स्वतःचे व कार्यकर्त्यांचे घरं भरू नका; सर्वसामान्यांचा उद्धार करा : पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 07:01 PM2022-01-27T19:01:16+5:302022-01-27T19:05:51+5:30
सत्ता आली म्हणून तिचा गैरवापर न करता तिचा वापर सर्व सामान्यासाठी करा असा सुचक सल्ला पंकजा मुंडे यांनी दिला
अंबाजोगाई : सत्ता ही स्वतःची व कार्यकर्त्यांचे घरं भरण्यासाठी नसते तर ती जनसामान्यांच्या उद्धारासाठी असते. मात्र, बीड जिल्ह्यात सत्ताधार्यांना जनतेच्या प्रश्नाशी कसलंही सोयर सुतक न राहिल्यानेच नगरपंचायतीच्या निवडणूकीत भाजपाला मोठे यश मिळाले असा आरोप भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला.
केज विधानसभा मतदार संघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या वतीने गुरूवारी दुपारी आई या त्यांच्या निवासस्थानी बीड जिल्ह्यात नगरपंचायतीच्या निवडणूकीत निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर खा.डॉ.प्रितम मुंडे, आ.सुरेश धस, आ.नमिता मुंदडा, भाजपाचे युवानेते अक्षय मुंदडा, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहन जगताप, भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, केज भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान केदार यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यात सध्या विरोधकांबद्दल मी एक बोलते, मात्र ते उत्तर दुसरच देवून जे प्रश्न उपस्थितीत केले जात आहेत. त्याकडे दिशाभूल केली जात आहे. मात्र बीड जिल्ह्यातील जनता खुप हुशार आहे. ‘कोणाचा पतंग कुठ कापायचा?‘ हे त्यांना बरोबर कळते. यासाठी सत्ता आली म्हणून तिचा गैरवापर न करता तिचा वापर सर्व सामान्यासाठी करा असा सुचक सल्ला पालकमंत्र्यांचे नाव न घेता पंकजा मुंडेंनी दिला नगर पंचायतींचा हा विजयाचा पॅर्टन आगामी काळातही कायम राहणार आहे. मात्र यासाठी कार्यकर्त्यांची एकजुट महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या अडीच वर्षात पालकमंत्र्यांनी बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कसलाही निधी आणला नाही. याउलट माझ्या काळात आणलेल्या निधीच्या माध्यमातूनच विकास कामांचे उद्घाटने सुरू आहेत. बीड जिल्ह्याच्या विकासाचं काय? तुम्ही किती निधी आणला ? असे प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थितीत केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बीड जिल्ह्यातील जनतेची मोठी उपेक्षा सुरू आहे. ना विमा ना अनुदान अशी त्यांची स्थिती झाली आहे. मात्र जनतेच्या या प्रश्नावर आपण आक्रमकपणे लढा उभारणार असल्याचे पंकजा यांनी सांगितले.
यावेळी बोलताना खा.डॉ.प्रितम मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्याच्या जनतेसाठी केंद्रातून रेल्वेला मोठा निधी प्राप्त झाला. रेल्वेसाठी आगामी काळातही मोठा निधी उपलब्ध होणार आहे. तर आ.सुरेश धस म्हणाले की, पंकजा मुंडे व खा.प्रितम मुंडे यांनी नविन नगरपंचायतींना केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालीच हे यश संपादन झाले असल्याचे आ.धस यांनी सांगितले. यावेळी बोलताना आ.नमिता मुंदडा म्हणाल्या की, बीड जिल्ह्यातील जनतेने नगर पंचायतीच्या निवडणूकीत जशी सर्व नगर पंचायतींमध्ये भाजपाला बहुमत दिले. तोच पॅर्टन जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या निवडणूकीत अंमलात येणार आहे. आगामी काळात मुंडे भगिनींचे नेतृत्व सक्षम करण्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अक्षय मुंदडा यांनी केले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक व दिनदयाळ बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सत्कार पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.