दरोड्यासाठी घराचे दार पेटवले; जागा झाला म्हणून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 12:08 AM2019-07-02T00:08:01+5:302019-07-02T00:15:01+5:30
मागील दीड महिन्यापासून चोरट्यांनी दोन दिवसाआड नांदूरघाटमध्ये थैमान घातले आहे. रात्री तर कहरच केला येथील सुभाष झाडबुके यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्याच्या इराद्याने १० ते १५ दरोडेखोरांनी दार पेटवून तसेच मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली.
नांदूरघाट : मागील दीड महिन्यापासून चोरट्यांनी दोन दिवसाआड नांदूरघाटमध्ये थैमान घातले आहे. रात्री तर कहरच केला येथील सुभाष झाडबुके यांच्या घरावर मोठा दरोडा टाकण्याच्या इराद्याने १० ते १५ दरोडेखोरांनी दार पेटवून तसेच मारहाण करत परिसरात दहशत निर्माण केली.
रात्रीच्या दीड ते तीनच्या दरम्यान पोलीस चौकीच्या मागील परिसरात बहुतांश घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला. घरामध्ये प्रवेश न करता आल्याने दरोडेखोरांनी परिसरातील घरांना बाहेरून कडी लावली. त्यानंतर मोर्चा सुभाष झाडबुके यांच्या घरावर वळवला. घरामध्ये सुभाष झाडबुके त्यांच्या पत्नी व आई एवढेच होते. दरोडेखोर घरावर चढण्याचा प्रयत्न करत होते. खूप प्रयत्न केले तरी आतमध्ये प्रवेश करता येईना म्हणून दरोडेखोरांनी दार हत्याराने तोडायला चालू केले. हे प्रयत्न निष्फळ ठरल्याने देशी दारू टाकून दार पेटवले व दुसऱ्या बाजूने दरवाजा तोडणे चालू होते. या आवाजाने झोपलेले सुभाष झाडबुके जागे झाले. त्यांनी तत्काळ कामावर असणाºया मुलाला उठवले. कशाचा आवाज येतोय म्हणून पाहण्यासाठी दुसºया दाराने बाहेर आले. बाहेर येताच चार ते पाच जणांनी झाडबुके यांच्यावर हल्ला केला. उर्वरित चार ते पाच जण पाठीमागून दार तोडत होते. झाडबुके यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु दरोडेखोरांनी काठ्याने मारायला चालू केले. पाठीमागील दरोडेखोरकडे शस्त्र होते. झटापट दहा ते पंधरा मिनिटे झाली. आरडाओरडा ऐकून शेजारील नंदकुमार मोराळे, फुलचंद तांबडे, शिवाजी जाधव राजाभाऊ मुंडे धावत आले.
मोठमोठ्याने ओरडून लोक जागे केले लोक जमा होऊ लागल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी पलायन केले. दरोडेखोरांच्या मारहाणीत झाडबुकेजखमी झाले. त्यांना येथील ग्रामीण रु ग्णालयात उपचारास दाखल केले. या दरोड्यामध्ये चोरी झाली नाही. सुभाष झाडबुके यांच्या प्रसंगावधानाने व व लोकांच्या जागरुकतेमुळे मोठा दरोडा टळला.
घटनेची माहिती मिळताच केजचे डीवायएसपी अशोक आमले, फौजदार सुरेश माळी, सिद्धे, पोलिस नाईक पुरी, आतिश मोराळेसह नऊ ते दहा पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बीड येथून श्वान पथकाला पाचारण केले. श्वानपथकाने चोरट्यांचा गावाच्या बाहेर सबस्टेशनपर्यंत माग काढला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आज दिवसभर सर्व अधिकारी व कर्मचारी तळ ठोकून आरोपींचा सुगावा काढत होते. शेवटची माहिती आल्या पर्यंत महत्त्वाचे धागेदोरे मिळाले नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी पुढील तपास डीवायएसपी आम्ले, पोलीस निरीक्षक बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धे हे करत आहेत.