डबल नोंदलेल्या ७१ हजार ४४१ मतदारांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 12:22 AM2018-10-06T00:22:26+5:302018-10-06T00:23:11+5:30
निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने शोधलेल्या एकसारख्या नोंदी असणाऱ्या ७१ हजार ४४१ मतदारांची तपासणी करण्यात येणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एम-३ प्रकारच्या सीयू, बीयू, व्हीव्हीपॅट अशा तीन प्रकारच्या १० हजार ४३५ इव्हीएम बीड जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या असून लवकरच त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने शोधलेल्या एकसारख्या नोंदी असणाऱ्या ७१ हजार ४४१ मतदारांची तपासणी करण्यात येणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एम-३ प्रकारच्या सीयू, बीयू, व्हीव्हीपॅट अशा तीन प्रकारच्या १० हजार ४३५ इव्हीएम बीड जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या असून लवकरच त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घोषित पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी राष्टÑीय व राज्य पातळीवरील मान्यताप्राप्त पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध झाली असून ३० आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधीत दावे, हरकती स्विकारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीबाबत राजकीय पक्षांना काही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप पुराव्यासह मतदार नोंदणी अधिकाºयांकडे दाखल करावेत. निवडणुकीची तयारी व प्रत्यक्ष निवडणूक पारदर्शी पध्दतीने होईल याची खात्री राजकीय पक्षांनी बाळगावी असे जिल्हाधिकारी म्हणाले
यावेळी एका पक्षाच्या प्रतिनिधीने काही बीएलओ त्याच गावचे रहिवासी असल्याचा मुद्दा उपस्थित करुन त्यांना बदलण्याची मागणी केली. तर याबाबत खात्री करुन त्यांना बदलण्यात येईल असे स्पष्ट केले. प्राप्त मशीनची एफएलसी करताना १ टक्के मशीनवर प्रत्येकी १२००, दोन टक्के मशीनवर १००० तर दोन टक्के मशीनवर प्रत्येकी ५०० मतदान करण्यात येणार आहे.
नव्या इव्हीएमचे वैशिष्ट्य
जुन्या इव्हीएममध्ये ४ बॅलेट युनिट जोडण्याची सोय होती. आता नवीनमध्ये २४ बॅलेट युनिट ( ३८४ उमेदवार ) जोडण्याची सोय आहे. या सर्व कामांची वेब कास्टींग तसेच संपूर्ण व्हिडीओ चित्रण करण्यात येणार आहे.
दुबार नोंदीचे मतदार वगळणार
मतदार यादीमध्ये दावे हरकती स्विकारण्याच्या कालावधीत निवडणूक आयोगाकडून सॉफ्टवेअरने एकसारख्या असलेल्या ७१ हजार ४४१ नोंदी शोधल्या. त्यानुसार मतदार तपासणीचे काम करण्यात येणार असून दुबार नोंदणी असणाºया मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.
अशी होणार
मतदानाची खात्री
फर्स्ट लेवल चेकींगमध्ये ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याच उमेदवाराला मतदान होते किंवा नाही याची खात्री व्हीव्हीपॅटस मशीनमधील मतदान झालेल्या चिठ्ठया मोजून करता येणार आहे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी स्वत: मतदान करुन पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांनाही सदरील प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेतले जाणार आहे.
१५ दिवस एफएलसी
आलेल्या सर्व इव्हीएम नवीन आहेत. यातील बीयू, सीयू तसेच व्हीव्हीपॅट्सची फर्स्ट लेवल चेकींग करण्यासाठी पुरवठादार बेल कंपनीचे इंजिनियर येणार आहेत. येत्या काही दिवसात बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात पहिल्या पातळीची चाचणी होणार आहे. कंपनीचे इंजिनियर, निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही चाचणी व तपासणी होणार आहे.