दुहेरी संकट ! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या घरी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 05:39 PM2020-08-25T17:39:16+5:302020-08-25T17:43:34+5:30
शहरातील जुने रेल्वे स्टेशन भागातील रुग्णाचा १७ आॅगस्ट रोजी अंबाजोगाईत उपचार चालू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला
परळी : आठ दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथील रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे परळीतील घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख एक लाख व तीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २२ आॅगस्ट रोजी जुने रेल्वे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या मावसभावाने येथील संभाजीनगर ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.
शहरातील जुने रेल्वे स्टेशन भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा १७ आॅगस्ट रोजी अंबाजोगाईत उपचार चालू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान त्याच्या पत्नीला आंबाजोगाईत दिराकडे होमक्वारंटाईन करण्यात आले होते. त्यासोबतच दोन मुलेही अंबाजोगाई येथे घरी थांबले होते. त्यामुळे परळी येथे त्यांचे घर बंद होते. २२ आॅगस्ट रोजी पहाटे घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घर फोडले. यावेळी त्यांनी कपाटातील एक लाख रुपये नगदी व सोन्याचे गंठण व कानातील झुंबर असा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच संबंधित व्यक्तीच्या मावसभावाने संभाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी भेट दिली पंचनामा केला. याप्रकरणी सोमवारपर्यंत एकही अरोपी अटक करण्यात आलेला नव्हता. तपास पोलीस उपनरीक्षक संतोष मरळ हे करीत आहेत.
किडनीच्या आजारासाठी ठेवली होती रक्कम
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला किडनीचा आजार होता. त्यांना उपचारासाठी पैसे लागतात म्हणून रोख रक्कम घरात कायम काढून ठेवलेली असत. त्यांना कोरोनाची लागण होण्यापुर्वीच ते लातूर येथून उपचार घेऊन आल्याची सूत्रांची माहिती आहे. उपचार घेऊन आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. यातच घरात चोरी झाल्यामुळे कुटुंबावर दुहेरी संकट ओढावले आहे.