प्रेम प्रकरणातून बीड जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड; तरुणासोबत मध्यस्थी करणाऱ्या माजी नगरसेवकालाही संपविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 03:54 PM2019-03-26T15:54:59+5:302019-03-26T16:03:47+5:30
प्रेम प्रकरणातून अपहरण झालेल्या तरुणाचे ऑनर किलिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार
पूर्णा (परभणी)/परळी (बीड) : प्रेम प्रकरणातून अपहरण झालेल्या तरुणाचे आॅनर किलिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर सुडाच्या भावनेनं तरुणाच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचीच हत्या केली. या दुहेरी हत्याकांडाने सोमवारी बीड जिल्हा हादरून गेला. या दोन्ही प्रकरणात पूर्णा आणि परळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
परळीतील प्रभाग क्रमांक आठमध्ये राहणाऱ्या अजय भोसले याचे प्रभागातीलच नातेवाईकाकडे राहणाऱ्या धर्माबाद येथील मुलीशी प्रेमसंबंध जुळले होते. त्यानंतर दोघे पळून गेले. काही दिवसांनंतर ते पूर्णा (जि.परभणी) येथे स्थायिक झाले होते. दरम्यान, आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार अजयच्या आई मंगलबाई यांनी ३ मार्च रोजी परळीतील संभाजीनगर ठाण्यात दिली होती. त्यावरून अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला. मुलाचे अपहरण पूर्णा येथून झाल्याने हे प्रकरण पूर्णा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर पूर्णा पोलिसांनी ६ आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला.
फौजदार चंद्रकांत पवार यांच्या पथकाने अपहरण प्रकरणात तपासाची चक्रे फिरवत आजूबाजूचा भाग पिंजून काढला. याचदरम्यान १८ मार्च रोजी परळी रेल्वेस्थानक परिसरातून शक्तीसिंग बावरी व बच्चनसिंग बावरी या मुलीचा चुलता व भाऊ या आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखविला. त्यांनी अजयची हत्या करून पुरून टाकल्याची कबुली दिली. अजयचा खून करून मृतदेह परळीतच एका उड्डाणपुलाखाली पुरल्याचेही सांगितले. पोलिसांनी २५ मार्च रोजी पहाटे अजयचा मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदन करण्यात आल्याचे तपास अधिकारी फौजदार चंद्रकांत राठोड यांनी सांगितले.
अजयचा मृतदेह काढण्याआधीच गायकवाडांची हत्या
अजय भोसलेच्या अपहरण प्रकरणात पूर्णा पोलीस २४ मार्च रोजी परळीत आले होते. त्यानंतर अजयचा खून करून त्याला परळीत पुरल्याचे हे वृत्त अजयच्या नातेवाईकांसह प्रभाग क्रमांक आठमध्ये पसरले. खुनाची बातमी ऐकल्यानंतर अजयचे नातेवाईक सुडाने पेटून उठले. त्यांना माजी नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांनी शांत करण्याचा आणि समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संताप अनावर झालेल्या अजयच्या नातेवाईकांसह इतरांनी अजयचा मृतदेह काढण्याआधीच गायकवाड यांची सशस्त्र हल्ला करीत हत्या केली.
२४ मार्चच्या मध्यरात्री ही थरारक घटना घडली. याप्रकरणी मुलगा प्रवीण गायकवाड याच्या फिर्यादीवरून संभाजीनगर ठाण्यात सचिन कागदे, मगर बल्लाळ, प्रदीप गवारे, बालाजी ऊर्फ बाळू गायकवाड, दयानंद बल्लाळ, अशोक भोसले, वामन भोसले, सुनील गवारे, विजय बल्लाळ, मंगलबाई भोसले, शोभाबाई भोसले यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पांडुरंग गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, तीन भाऊ, पुतणे, भावजयी असा परिवार आहे.
पोलिसांनी रेल्वे रोखल्या
खून झाल्यानंतर आरोपी रेल्वेने पसार होण्याच्या तयारीत होते. मात्र, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला संपर्क केला. त्यानंतर रेल्वे गाड्या रोखण्यात आल्या. त्यामुळे आरोपी पटरीने पळाले. पहाटेच्या सुमारास परळीपासून काही अंतरावर चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. इतर आरोपींचाही पोलीस शोध घेत आहेत.
मुंडे, बोºहाडेंची धाव : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. गतीने तपास करण्यासह मारेकऱ्यांना अटक करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.