नालीचे काम अपूर्ण; रापम कर्मचारी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:33 AM2021-04-01T04:33:56+5:302021-04-01T04:33:56+5:30
बीड : येथील बसस्थानकाच्या बाजूस असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या निवासगृहांमध्ये समस्या वाढल्या आहेत. नाली कामाच्या नावाखाली संरक्षण ...
बीड : येथील बसस्थानकाच्या बाजूस असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या निवासगृहांमध्ये समस्या वाढल्या आहेत. नाली कामाच्या नावाखाली संरक्षण भिंती तोडल्या. दोन महिन्यांपासून काम अपूर्ण असल्याने या क्वार्टरमध्ये कोणीही येत आहेत. तसेच रात्रीच्या सुमारास चोऱ्यांचे प्रमाणही वाढले असून गस्त घालावी लागत आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी बुधवारी विभागीय नियंत्रकांकडे तक्रार केली आहे.
राज्य परिवहन महामंडळात कर्तव्य बजावणाऱ्या चालक, वाहक, तंत्रज्ञ आदी कर्मचाऱ्यांसाठी बसस्थानकाच्या बाजूस व न्यायालयाच्या पाठीमागील बाजूस १६ निवासस्थाने आहेत. परंतु येथे कसल्याच सुविधा मिळत नसल्याची ओरड कर्मचाऱ्यांमधून आहे. दोन महिन्यांपूर्वी येथे नालीचे काम करायचे आहे, यासाठी संरक्षण भिंत म्हणून लावलेले पत्रे काढण्यात आले. परंतु अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय संरक्षण भिंत नसल्याने वस्तू, वाहनांतील इंधन चोरीचे प्रकार वाढले आहेत. तसेच येथे एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शंका व्यक्त करीत या कर्मचाऱ्यांनी काम पूर्ण करून संरक्षण देण्याची मागणी विभागीय नियंत्रकांकडे केली आहे. याबाबत हे सर्व कर्मचारी बुधवारी स्थापत्य अभियंता यांनाही भेटले आहेत. वेळीच याची दखल घेऊन समस्या मार्गी लावण्याची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. निवेदनावर सादेक बेग, एस.डी.गमे, एम.के.फटे, एल.एल.कांबळे, एस.एन.कोकाटे, व्ही.मुंजाळ, पी.के.धुरंधरे, सय्यद रज्जाक, ए.के.वाघमारे, आर.आर.जाधव, पी.जे.काशीद, एस.बी.भालेराव, ए.एम.काेपले, पायाळ, निर्मळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
===Photopath===
310321\312_bed_12_31032021_14.jpeg
===Caption===
रापम कर्मचारी रहात असलेल्या ठिकाणी दोन महिन्यांपासून रखडलेले नालीचे काम.