लॉकडाऊन न करता पर्यायी मार्ग काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:55+5:302021-04-29T04:25:55+5:30
बीड : लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांचे जनजीवन विस्कळीत होते. अनेक उद्योगधंदे ठप्प पडतात. व्यापाऱ्यांना दुकानभाडे, वीजबिल, कामगारांचा पगार दुकान बंद ...
बीड : लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांचे जनजीवन विस्कळीत होते. अनेक उद्योगधंदे ठप्प पडतात. व्यापाऱ्यांना दुकानभाडे, वीजबिल, कामगारांचा पगार दुकान बंद असले तरीही द्यावा लागतो. लॉकडाऊनमुळे अनेकजण रोजगारापासून वंचित राहात आहेत. त्यामुळे लॉकडाऊन न करता, यातून पर्याय काढावा. हॉटेल बंद केल्याने मंदीत असलेला हा व्यवसाय पुन्हा अडचणीत सापडला आहे. लॉकडाऊनवर पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी व्यावसायिकांमधून होत आहे.
‘रोहयो’च्या कामांची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. कोरोनाचे संकट उद्भवल्याने शहरी भागातील कामेही बंद झाली आहेत. सध्या कामच नसल्यामुळे अनेक कुटुंबांचे रोजगाराअभावी हाल सुरू आहेत. यासाठी शासनाने रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी मजुरांमधून केली जात आहे.
भाज्यांचे भाव आवाक्यात
अंबाजोगाई : ग्रामीण भागातून भाज्यांची आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली आहे. यातच कोरोना लॉकडाऊनमुळे केवळ चार तासच व्यवसाय करावा लागत असल्याने टोमॅटो, बटाटे, पत्ताकोबी, फुलकोबी, फळभाज्या कमी दराने विकाव्या लागत आहेत. स्वस्त भाज्यांमुळे ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.
सूचनांचे पालन गरजेचे
बीड : पहिल्या टप्प्यात नागरिकांच्या सहकार्याने कोरोनावर मात करता आली. आता पुन्हा नव्याने हे आव्हान समोर आले असून, यासाठी मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे. परंतु, बाजारात लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत.
गॅस सिलिंडरचा गैरवापर
बीड : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा तालुक्यातील काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जात आहे.
पुलांचे कठडे गायब
बीड : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाईप तोडून भंगारमध्ये नेऊन विकले. त्यामुळे वाहनांना पुलावरून जाताना धोका निर्माण होत आहे.
पिकांवर कीड
बीड : जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये सध्या उन्हाळी पिके बहरू लागली आहेत. परंतु, ढगाळ वातावरणामुळे या पिकावर किडींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.